कौटुंबिक बदनामीपेक्षा 'त्या' तिघांनी मृत्यूला कवटाळले ! गंगाखेड हादरवणाऱ्या घटनेचे गूढ उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2024 04:42 PM2024-12-06T16:42:23+5:302024-12-06T16:43:40+5:30
आरोपी पोलिसांच्या ताब्यात; वाचा घटनेची पार्श्वभूमी आणि कसा पकडला आरोपी
गंगाखेड : एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याचे प्रकरण राज्यभरात गाजले होते. या घटनेमागील गूढ अखेर उलगडले. मयत मुलीस माझ्यासोबत लग्न कर अन्यथा तुझ्यासोबतचे असलेले व्हिडीओ, फोटो व्हायरल करण्याची ब्लॅकमेलिंग वजा धमकी शिक्षकी कुटुंबाला सहन न झाल्याने ही आत्महत्या घडल्याचे मूळ कारण आहे. शिक्षकीपेशातील कुटुंबाने बदनामीपेक्षा मृत्यूला कवटाळल्याचे यातून पुढे आले आहे. यात आरोपी युवकास गंगाखेड पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
गंगाखेड शहरानजीकच्या धारखेड शिवारातील रेल्वे रुळावर २८ नोव्हेंबरला दुपारी ममता माध्यमिक विद्यालयातील शिक्षक मसनाजी तुडमे, त्यांच्या पत्नी रंजना व मुलगी अंजली यांनी सामूहिक आत्महत्या केल्याच्या घटनेने गंगाखेड हादरले होते. या घटनासंदर्भाने जिल्ह्यासह राज्यभरात तर्कवितर्क लढविले जाऊ लागले. याप्रकरणी मयताचे भाऊ फिर्यादी शिवाजी तुडमे (रा. किन्नी (कदू), ता. अहमदपूर) यांच्या फिर्यादीवरून आरोपी शिवम नारायण राऊत (२१, रा. परभणी) या युवकाविरुद्ध गंगाखेड ठाण्यात गुरनं ७६४/२०२४ कलम १०८ भा.न्या.सं.अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सीडीआर, आयओंचे तपास कौशल्य, आरोपी निष्पन्न
या घटनेचा तपास करणे पोलिसांना आव्हान होते. मात्र, तपास अधिकारी सपोनि. सुनील इंगळे यांच्या तपास कौशल्यास यश आले. आरोपी युवकाच्या मोबाइल सीडीआरवरून तपास अधिकाऱ्यांना संशय बळावला. चौकशीसाठी आरोपीस बोलाविले असता संबंधित मुलीस व कुटुंबास ब्लॅकमेलिंग करत आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो व्हायरल केल्याचे कबूल केले. यावरून ४ डिसेंबर रात्री ११:३० वाजता गंगाखेड ठाणे डायरीत ५३/२०२४ नुसार नोंद घेण्यात आली. गुरुवारी दुपारी आरोपीस न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
घटनेची पूर्वपार्श्वभूमी
फिर्यादीच्या तक्रारीनुसार घटनेची पूर्वपार्श्वभूमी पुढीलप्रमाणे : या प्रकरणातील आरोपीने फिर्यादीची मयत पुतणीसोबत लग्न करून द्या, नाही तर तिच्यासोबत असलेले काढलेले व्हिडीओ व फोटो हे व्हायरल करून तुम्हा सर्वांची बदनामी करेल, तसेच संबंधित मुलीसोबतचे आक्षेपार्ह काढलेले फोटो व्हायरल केले. त्यामुळे होत असलेल्या बदनामी व मानसिक त्रासाला कंटाळून फिर्यादीचा भाऊ मसनाजी तुडमे, रंजना तुडमे व अंजली तुडमे तिघांनी एकत्रित रेल्वे रुळाखाली सामूहिक आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे करीत आहेत.
कुटुंबात संवाद हवा
आज-काल मोबाइलमध्ये समाजमाध्यमांचे विविध प्रकार वाढले आहेत. ज्यात युवा पिढी गुंतून जात आहे. पालकांनी आपला पाल्य कुठल्या कौटुंबिक सामाजिक परिस्थितीत वावरत आहे. यात गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. चुकून एखादा प्रकार घडल्यास पालक- पाल्य यांच्या संवादातून अनेक प्रश्न कुटुंबाच्या चार भिंतीत सहज सुटू शकतात. ज्यातून दुर्घटना टळते.
- डॉ. दिलीप टिपरसे, उपविभागीय पोलिस अधिकारी.