संस्थेने १० वर्षांपासून वेतन थकवले; लेकराबाळांसह शिक्षकांनी जिल्हा परिषद कार्यालय गाठले
By ज्ञानेश्वर भाले | Published: November 22, 2023 06:23 PM2023-11-22T18:23:59+5:302023-11-22T18:28:35+5:30
दहा वर्षापासून अडचणी जैसे थे; संस्थाचालकांसह शिक्षण विभागाचे दुर्लक्ष
परभणी : गेल्या दहा वर्षापासून साेनपेठमधील खाजगी शाळेतील शिक्षकांना वेतन मिळत नसल्यामुळे त्यांनी बुधवारी चक्क जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातच आपल्या लेकरा बाळांसह शाळाच भरवली. वारंवार तक्रारी, मागणी करूनही संबंधित संस्थाचालकांसह शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता वेतनाबाबत निर्णय सकारात्मक होईपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रता संबंधित शिक्षकांना घेतला आहे.
सोनपेठमधील स्वामी माधवाश्रम शिक्षण संस्थेतंर्गत श्री. मुक्तेश्वर प्राथमिक विद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षकांना जवळपास गेल्या दहा वर्षापासून विविध अडचणींचा सामना करावा लागत आहेत. शाळेतील कार्यरत शिक्षकांना गत दहा वर्षापासून वेतन मिळत नसल्याची स्थिती आहे. नियमित आपले कर्तव्य बजावून सुद्धा संबंधित संस्थाचालक आणि शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने संबंधित शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत गतकाही वर्षापासून सकारात्मक निर्णय होत नसल्याने शेवटी वैतागलेल्या शिक्षकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून बुधवारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात आपल्या न्याय हक्कासाठी ठाम मांडले. यात संबंधित शिक्षक, शिक्षिका हे आपल्या लेकरा बाळांसह आल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. सोबत लहान मुल असल्यामुळे संबंधितांनी शिक्षण विभागाच्या दालनातच मुलांसाठी झोका बांधून आपला लढा दिला.
दहा वर्षापासून संस्थेने वेतन थकवले, शिक्षकांनी परभणी जिल्हा परिषदेत कुटुंबासह ठिया दिला pic.twitter.com/FbQkjtgNHs
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) November 22, 2023
या शिक्षकांचे रखडलेले वेतन
सोनपेठमधील स्वामी माधवाश्रम शिक्षण संस्था संचलित श्री. मुक्तेश्वर प्राथमिक विद्यालयात कार्यरत असलेल्या के.टी तोडकरी, जे.व्ही. कुलकर्णी, के.पी. जोगदंड, आर.आर. चौरे, पी.आर. बुच्छलवार या शिक्षकांचे गत दहा वर्षापासून वेतन रखडले असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. वारंवार पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर संबंधित शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनातच बुधवारी आपली शाळा भरवली.
आंदोलनामुळे उडाली तारांबळ
संबंधित शिक्षकांनी आम्हाला न्याय मिळाला नाही तर २२ नोव्हेंबरपासून कुटुंबासह शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात उपोषण करणार असल्याचे निवेदन काही दिपसांपुर्वीच शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. परंतु त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यात आले नसल्याने संबंधित शिक्षकांनी बुधवारी सकाळपासूनच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या दालनात शाळा भरवल्याचे पुढे आले. यामुळे विविध घोषणांमुळे कार्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले हाेते.