कोरोना केंद्रांना भेटी देऊन पथकाने घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:17 AM2021-04-10T04:17:29+5:302021-04-10T04:17:29+5:30
परभणी : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरात सुरू केलेल्या विविध कोरोना केंद्रांना भेटी देऊन केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी कोरोनाचा आढावा घेतला. ...
परभणी : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरात सुरू केलेल्या विविध कोरोना केंद्रांना भेटी देऊन केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी कोरोनाचा आढावा घेतला.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासनाने कोविड हॉस्पिटल व कोविड केअर केंद्र सुरू केले आहेत. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची माहिती घेण्यासाठी केंद्र शासनाने पथक पाठविले असून, दोन अधिकारी गुरुवारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या अधिकार्यांनी गुरुवारी जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन कोरोना स्थितीची माहिती जाणून घेतली होती.
शुक्रवारी सकाळपासूनच अधिकाऱ्यांनी विविध कोरोना केंद्रांना भेटी देण्यास प्रारंभ केला. या दोन्ही अधिकाऱ्यांनी सुरुवातीला महानगरपालिकेच्या कल्याण मंडपम येथील रुग्णालयाला भेट देऊन त्या ठिकाणी सुरू असलेल्या लसीकरणाची माहिती घेतली. तसेच प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सुविधांचाही आढावा घेतला. शहरातील आयटीआय परिसरात मुख्य कोरोना सेंटर असून, याठिकाणीही अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी कोअर सेंटरमध्ये उपलब्ध असलेले ऑक्सिजन सिलिंडर, उपलब्ध असलेले बेड आणि प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती अधिकाऱ्यांनी घेतली. या ठिकाणी डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी निवास सुविधा आहे का, त्यांना केंद्रात येण्यासाठी स्वतंत्र रस्ता आहे का, याची माहिती घेतली. जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर त्याला रुग्णालयापर्यंत भरती करण्याची प्रक्रिया कशी आहे, याची माहितीही जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले, जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचा स्वतंत्र व्हाॅट्सॲप ग्रुप तयार केला असून, कोरोनाबाधित रुग्णांची माहिती या ग्रुपवर दिली जाते. त्यानंतर संबंधित कर्मचारी रुग्णांपर्यंत पोहोचून १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या साहाय्याने त्यास दवाखान्यामध्ये दाखल करतात. केलेल्या उपाययोजनांच्या प्रत्येक बाबींच्या नोंदी अधिकाऱ्यांनी घेतल्या. दिवसभरामध्ये आयटीआय भागातील कोविड हॉस्पिटल तसेच जिल्हा परिषदेतील नवीन कोरोना केंद्रासही या अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी उपस्थित अधिकार्यांची बैठक घेऊन कोरोनाबाधित रुग्णांच्या कागदपत्रांचीही तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वदडकर, उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रकाश डाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर सुरवसे, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
पथकाच्या निष्कर्षाकडे लक्ष
अधिकाऱ्यांनी शुक्रवारी शहरात फिरून पाहणी केली. त्यामुळे हे अधिकारी काय बदल सुचवितात, याकडे लक्ष लागले आहे. दिवसभरातील पाहणीचा हा अहवाल केंद्र शासनाला सादर केला जाणार आहे किंवा दौरा संपल्यानंतर जिल्हा प्रशासनाला आवश्यक त्या बाबी सुचवल्या जातील, अशी शक्यता आहे. त्यामुळे या पथकाच्या निष्कर्षाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
प्रतिबंधित क्षेत्राला दिली भेट
परभणी शहरातील रामकृष्णनगर भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक असल्याने हा भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. केंद्राच्या दोन्ही अधिकाऱ्यांनी शुक्रवारी या परिसराला भेट देऊन रुग्णांची व केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच शहरातील इतर प्रतिबंधित भागालाही अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या.