टेक्नोसॅव्ही जमाना! परभणीत महिन्याभरात ८ हजार स्मार्टफोनची विक्री, ९ कोटींची उलाढाल
By राजन मगरुळकर | Published: August 18, 2023 03:52 PM2023-08-18T15:52:39+5:302023-08-18T15:54:23+5:30
जवळपास एक हजारापासून ते दीड लाखापर्यंतच्या किमतीचे मोबाइल विविध ठिकाणी उपलब्ध आहेत.
परभणी : महागडे स्मार्ट फोन खरेदी करण्याचे फॅड आता वाढत आहे. त्यातही महाविद्यालयीन युवकांचा वाटा यात अधिक आहे. शहरात सध्या १५ पेक्षा अधिक मोबाइल कंपन्यांचे वेगवेगळे हँडसेट विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या हँडसेटच्या विक्रीतून जिल्ह्यात साधारणपणे दररोज ३० लाखांची उलाढाल होत आहे. महिन्याकाठी साधारणपणे आठ हजारांहून अधिक हँडसेटची खरेदी होत आहे. यामुळे टेक्नोसॅव्हीच्या जमान्यात जिल्ह्यातील व्यापारी वर्गात नऊ कोटी खजिन्याची उलाढाल खरेदी-विक्रीच्या माध्यमातून होत आहे.
शहरात जागोजागी मोबाइल मार्केट निर्माण झाली आहेत. मुख्य रस्ते, चौक आणि व्यापारी संकुलात विविध कंपन्यांच्या मोबाइल विक्रीची मोठी ३० ते ४० दुकाने आहेत. याशिवाय मोबाइलसाठीची ॲक्सेसरीज आणि इतर साहित्यविक्रीची दुकानेही थाटली आहेत. जवळपास एक हजारापासून ते दीड लाखापर्यंतच्या किमतीचे मोबाइल विविध ठिकाणी उपलब्ध आहेत. यापैकी अँड्रॉइड व अधिक मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा असलेल्या मोबाइलना तरुणाईची मोठी पसंती आहे. मार्केटमधील ४० मोबाइल दुकानांवर दिवसभरात वेगवेगळ्या प्रकारच्या २०० ते २५० मोबाइलची विक्री होते. या माध्यमातून ३० लाखांपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल दररोज होत असते. यापूर्वी की-पॅडचे मोबाइल वापरण्याची सवय अनेकांना होती. मात्र आता टच स्क्रीन व अँड्रॉइड मोबाइलना अधिक पसंती मिळत आहे.
नवीन तंत्रज्ञानाला पसंती
म्युझिक सिस्टम, टच स्क्रीन, नेट प्रोसेसिंग, कलर व्हरायटीज यांकडे तरुणांचा ओढा अधिक आहे. आता नवीन मार्केटमध्ये येणाऱ्या मोबाइलमध्ये एचडी गुणवत्तेबरोबरच वॉटरप्रूफ या सुविधादेखील आहेत. त्याचबरोबर पाच इंच लांबीचा १३ मेगापिक्सल कॅमेरा, विंडोज फोन असलेले मोबाइलदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
ऑनलाइन खरेदीमुळे उलाढालीवर परिणाम
बदलत्या काळानुसार आता बाजारपेठेतील खरेदीपेक्षा अनेक जण ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या खरेदी-विक्रीकडे वळले आहेत. यातच सण, उत्सव तसेच वर्षभरातून वेगवेगळ्या कालावधीमध्ये मिळणारी ऑनलाईन खरेदीवरील सूट लक्षात घेता घरातील दैनंदिन उपयोगी पडणाऱ्या वस्तूंपासून ते मोबाईल, लॅपटॉप सोबतच विविध वाहनांच्या खरेदी सुद्धा ऑनलाइन केल्या जातात. याचे प्रमाण शहरी भागासोबतच ग्रामीण भागामध्येही वाढले आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाच्या फिचर्सचा समावेश असलेले मोबाईल खरेदी करताना अनेक जण ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देत आहेत. मिळणाऱ्या सूट आणि घरपोच सुविधामुळे ही खरेदी वाढली. परिणामी, बाजारपेठेत दुकानांमध्ये होणाऱ्या उलाढालीला याचा फटका बसत आहे.
ई-वेस्टच्या समस्येत पडतेय भर
कोरोनापासून अँन्डराँईड मोबाईल खरेदीचे प्रमाण वाढले आहे. जो-तो आपल्याला हव्या असलेल्या फिचरच्या मोबाईलची खरेदी करत आहे. यात घरोघरी प्रति व्यक्ती एक मोबाईल असे समीकरणच बनले आहे. त्यात साधारण दोन ते तीन वर्ष एक मोबाईल वापरला की तो पुन्हा बदलला जातो. त्यामुळे अशा प्रकारे जुने मोबाईल अडगळीत पडत आहेत. यातूनच ई-वेस्टचे प्रमाण वाढले आहे. मोबाईल, टँब, लँपटाँप, संगणक आणि त्यांच्याशी निगडीत असलेले साहित्य यांची भर पडत आहे. हा ई-कचरा पूर्नवापराविना तसाच ठेवला जात आहे.
किमान किंमत : एक हजार
कमाल किंमत : दीड लाख व त्याहून अधिक.
दररोजची विक्री : २०० ते २५०
शहरातील दूकाने : ३० ते ४०
जिल्ह्यातील मोठी दूकाने : ८०
येथून केली जाते खरेदी
मुंबई, पूणे, बेंगलोर, दिल्ली यासह थेट कंपनीच्या वतीने शहरात हे मोबाईल विक्रीसाठी पाठविले जातात.