तहसिलदाराने लाच स्वीकारली बुलढाण्यात, घरझडती परभणीत
By राजन मगरुळकर | Updated: April 12, 2024 20:05 IST2024-04-12T20:05:29+5:302024-04-12T20:05:42+5:30
एसीबी पथकाकडून आदेशावरून पंचासमक्ष तपास

तहसिलदाराने लाच स्वीकारली बुलढाण्यात, घरझडती परभणीत
परभणी : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील आरोपी तहसीलदार यांनी वाळूचे ट्रॅक्टर सोडण्यासाठी ३५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारली. त्यांना एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुलढाण्यात एसीबी विभागाने केली. या कारवाईनंतर त्वरित एसीबी विभागाच्या प्राप्त माहिती आणि आदेशावरून परभणी एसीबी युनिट पथकाने आरोपी लोकसेवक मूळ रहिवासी असलेल्या परभणीतील मंगलमूर्ती नगरच्या घराची झडती घेतली. यामध्ये ९ लाख ४० हजार रुपये रोख रक्कम आणि निर्माणाधीन असलेली टोलेजंग इमारत अंदाजे किंमत दीड कोटी व इतर साहित्य अशी मालमत्ता मिळून आली.
एसीबी विभागाने दिलेली माहिती अशी, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे तहसीलदारपदावर सचिन शंकरराव जैस्वाल हे कार्यरत आहेत. तहसीलदार जैस्वाल हे परभणीतील मंगलमूर्ती नगर भागातील मूळ रहिवासी आहेत. यामध्ये आरोपी लोकसेवक जैस्वाल यांनी वाळूचे ट्रॅक्टर सोडण्यासाठी ३५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारली असता त्यांना त्यांचे चालक मंगेश कुलथे, शिपाई पंजाबराव ताटे यांच्यासह बुलढाणा येथील एसीबी पथकाने शुक्रवारी ताब्यात घेतले. या कारवाईनंतर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया शुक्रवारी बुलढाण्यात सुरू होती. वरील कारवाईची माहिती एसीबी विभागाच्या परभणी पथकाला वरिष्ठ यंत्रणेकडून प्राप्त झाली.
त्यानुसार नांदेड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचासमक्ष परभणीच्या पथकाने येथील घराची झडती घेतली. परभणी एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अशोक इप्पर, पोलिस निरीक्षक सदानंद वाघमारे, पोलिस कर्मचारी चंद्रशेखर निलपत्रेवार, अनिरुद्ध कुलकर्णी, सीमा चाटे, संतोष बेदरे, कल्याण नागरगोजे, अतुल कदम, जे. जे. कदम, अनिल नरवाडे यांच्या पथकाने घरझडती घेतली. घरझडतीमध्ये ९ लाख ४० हजार रुपये रोख रक्कम आणि तळमजला व चार मजले अशी निर्माणाधीन असलेली टोलेजंग इमारत अंदाजे किंमत दीड कोटी रुपये व इतर साहित्य अशी मालमत्ता मिळून आली.