परभणीत अस्थायी कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 04:23 PM2019-01-01T16:23:11+5:302019-01-01T16:23:39+5:30
पोलिसांनी सतर्कतेने त्यास ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठातील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास एका अस्थायी कर्मचाऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सतर्कतेने त्यास ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.
शेख शकील अहमद शेख रहीम असे या कर्मचाऱ्यांचे नाव असून ते पशु वैद्यक महाविद्यालयात अस्थायी स्वरूपात पशू परिचर या पदावर कार्यरत आहेत. पशूवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालयाच्या सेवेत कायम आस्थापनेवर सामावून घ्यावे, अशी या कर्मचाऱ्याची मागणी आहे.
शेख शकील अहमद शेख रहीम हे मागील साडेतीन वर्षांपासून सेवेत कायम करावे या मागणीसाठी विद्यापीठाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र त्यांना केवळ अश्वासानेच मिळत असल्याने ते निराश झाले होते. २० डिसेंबर २०१८ रोजी मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सेवेत सामावून घेण्याचा निर्णय झाला होता; मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे शेख शकील यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
या इशाऱ्यानुसार १ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शेख शकील हे पशू वैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात आले. त्यांच्या हातात पेट्रोलची बाटली होती. यावेळी नवा मोंढा पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रशांत दीपक, दिनेश चव्हाण आणि रामचंद्र फड यांनी शेख शकील यांना तातडीने ताब्यात घेऊन पेट्रोलची बाटली हस्तगत केली. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.