परभणी, बीड, जालना येथील दुचाकी चोरीचे दहा गुन्हे उघड
By राजन मगरुळकर | Published: March 28, 2023 04:36 PM2023-03-28T16:36:39+5:302023-03-28T16:36:52+5:30
स्थागुशाच्या कारवाईत तीन आरोपी ताब्यात : दहा दुचाकी जप्त
परभणी : स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने रेल्वेस्थानक परिसरातून दोन जणांना दुचाकी चोरीच्या प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेतले. यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केल्यावर अन्य एका आरोपीस मानवत तालुक्यातील रामपुरी येथून ताब्यात घेतले. या तीन जणांनी परभणी, बीड, जालना येथील दुचाकी चोरीचे दहा गुन्हे कबूल केले असून त्यांच्या ताब्यातून १० दुचाकी जप्त करण्यात आल्या.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस उपनिरीक्षक साईनाथ पूयड, नागनाथ तुकडे, मारोती चव्हाण, व्यंकट कुसुमे व कर्मचाऱ्यांना मिळालेल्या माहितीवरून आकाश सर्जेराव जाधव व त्याचा भाऊ विलास सर्जेराव जाधव ( रा. नामदेव नगर, पाथरी ) यांच्याकडे चोरी केलेल्या दुचाकी असल्याचे समजले. नमूद आरोपी हे रेल्वे स्थानक परभणी येथे दुचाकी चोरीसाठी सोमवारी आले असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने या दोन संशयितांना परभणी रेल्वे स्थानक येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दोन दुचाकी आढळून आल्या. जप्त दुचाकीबाबत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांना विचारपूस केली असता सदरील चोरी साथीदार दिनेश अर्जुन गायकवाड (रा. सेलू) याच्यासोबत केल्याचे त्यांनी कबूल केले. यानंतर दिनेश गायकवाड याला रामपुरी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक रागसुधा. आर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.
या ठिकाणच्या दुचाकी जप्त
यात परभणी शहर, मानवत, सेलू, पाथरी, परतुर, आष्टी, माजलगाव येथून दुचाकी चोरल्याचे त्यांनी सांगितले. नमूद आरोपींकडून दहा दुचाकी जप्त केल्या आहेत. या आरोपींना तपासासाठी सेलू ठाण्यात हजर करण्यात आले आहे.