परभणी जिल्ह्यात दहा कोविड केअर सेंटर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 06:31 PM2020-11-06T18:31:46+5:302020-11-06T18:33:54+5:30

रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याने कोरोनाचा अनेक रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात खाटा रिक्त आहेत.

Ten Covid Care Centers closed in Parbhani district | परभणी जिल्ह्यात दहा कोविड केअर सेंटर बंद

परभणी जिल्ह्यात दहा कोविड केअर सेंटर बंद

Next
ठळक मुद्देआय.टी.आय. हॉस्पिटलमध्येच उपचार रुग्ण घटल्याचा परिणाम 

परभणी:  जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने शहरात जिल्हा रुग्णालयासह विविध भागात सुरू केलेले कोविड केअर सेंटर आता बंद करण्यात आले असून, जिंतूर रस्त्यावरील आय.टी.आय. हॉस्पीटलमध्येच आता रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.

ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत गेला. रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याने कोरोनाचा अनेक रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात खाटा रिक्त आहेत. तसेच गंभीर लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना गृह विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे.  ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी शहरातील कोविड सेंटर बंद करुन आय.टी.आय. रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शहरातील उभारण्यात आलेले जवळपास ९ कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहेत. त्यात  जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील कक्ष, अर्थो हॉस्पीटल, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील हॉस्पीटल, अक्षदा मंगल कार्यालय, रेणुका मंगल कार्यालय, वैष्णवी मंगल कार्यालय त्याचप्रमाणे हाॅटेल ग्रीन लिफ आणि सीटी पॅलेस येथील कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता केवळ जिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णालयासह आय.टी.आय. हॉस्पीटल याच ठिकाणी रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील सुत्रांनी दिली. 

आर्थो रुग्णालय हस्तांतरित
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा रुग्णालयातील अर्थो रुग्णालयाची इमारत कोरोना रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आली होती. मात्र आता रुग्णांची संख्या घटल्याने ही इमारत अर्थो हॉस्पीटलकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. आता या ठिकाणी अपघात आणि हाडांच्या संदर्भाने दाखल होणाऱ्या नियमित रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

७ खाजगी रुग्णालयात एकही रुग्ण नाही
शहरातील ९ खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र त्यापैकी ७ खाजगी रुग्णालयात सध्या एकही रुग्ण उपचार घेत नाही. खाजगी रुग्णालयातील ही सुविधा प्रशासनाने बंद केलेली नाही. त्यामुळे रुग्ण आढळल्यास खाजगी रुग्णालयातही उपचार घेऊ शकतो.

शहरात ९४५ खाटा रिक्त
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरात शासकीय आणि खाजगी रुग्णालयात मिळून १ हजार ६३  खाटा उपलब्ध केल्या होत्या. त्यापैकी ९४५ खाटा सद्यस्थितीत रिक्त आहेत. त्यामध्ये शासकीय रुग्णालयांसह काही खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयातील सारी कक्ष, आय.एस.ओ. कक्ष, अर्थो रुग्णालय, कस्तुरबा गांधी विद्यालय, अक्षदा मंगल कार्यालय, रेणुका मंगल कार्यालय, वैष्णवी मंगल कार्यालयातील सर्व खाटा रिक्त आहेत.

जिल्ह्यात ६ हजार ७०० रुग्णांची नोंद
जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ७०४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी ६ हजार २१५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या २१९ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपलब्ध केलेल्या खाटा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत.

Web Title: Ten Covid Care Centers closed in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.