दहा हजार हेक्टर शेतजमीन सिंचनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:15 AM2021-04-26T04:15:11+5:302021-04-26T04:15:11+5:30
गतवर्षी सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे एक ते दोन ...
गतवर्षी सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे एक ते दोन महिने गोदापात्र तुडुंब भरून वाहिले. तसेच पैठण आणि माजलगाव धरणातून सातत्याने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा विचार करून मोठ्या प्रमाणात बागायती पिके घेतली. तसेच तालुक्यातील आनंदवाडी, महातपुरी, खळी, चिंचटाकळी, गोंडगाव, सावंगी, सुनेगाव सायाळा, मुळी, धारखेड, नागठाणा, पिंपरी, झोला आदी गावातील चारबी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीमध्ये गोदावरी नदीपात्रातील उपलब्ध पाण्याचा विचार करून विद्युत मोटारीच्या साह्याने गोदा पात्रातील पाणी उपसा सुरू केला. रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकेही बहरली. मात्र, सद्य:स्थितीत गोदावरी नदीपात्रात पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे तालुक्यातील दहा हजार हेक्टर सिंचन रखडले आहे. परिणामी, शेतकरी हवालदिल झाला असून याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष देऊन पैठण आणि माजलगाव धरणातून गोदावरी नदीला पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी १० गावांतील शेतकऱ्यांमधून होत आहे.
पैठण आणि माजलगाव धरणातून पाणी सोडा
तालुक्यातील १० गावांतील शेतकरी सध्या पाणी उपलब्ध नसल्याने अडचणीचा सामना करत आहेत. यामुळे गोदावरी नदीपात्रात पैठण आणि माजलगाव धरणातून पाणी सोडणे गरजेचे आहे. या परिस्थितीत पिकांना वाचवण्यासाठी पाणी सोडावे, अशी मागणी १० गावातील शेतकरी प्रशासनाकडे करत आहेत.