माता व अर्भक मृत्यूनंतर पूर्णा ग्रामीण रुग्णालयात तणाव
By राकेशजोशी | Published: October 11, 2018 04:35 PM2018-10-11T16:35:09+5:302018-10-11T16:35:45+5:30
महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने रुग्णालयात तणावाची स्थिती होती.
पूर्णा (परभणी) : ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या एका गरोदर महिलेने मृत अर्भकास जन्म दिला. तसेच यानंतर मातेचाही मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे ग्रामीण रुग्णालयात घडली. यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने रुग्णालयात तणावाची स्थिती होती.
तालुक्यातील आहेरवाडी येथील रेणुका भोसले या आज पहाटे ३ वाजेच्या दरम्यान बाळंतपणासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्या. सुमारे दोन तासानंतर त्यांनी एका बाळास जन्म दिला पण ते मृत होते. यानंतर रेणुका यांना तीव्र रक्तस्त्राव झाल्याने त्यांचाही मृत्यू झाला. या प्रकारानंतर रेणुका यांच्या नातेवाईकांनी रुग्णालये प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत दोघांच्या मृत्यूस जबाबदार धरले. तसेच इतर नातेवाईकांनी सुद्धा रुगणालयात गर्दी करत संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली .
पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी रुग्णालयातील नातेवाईकांची भेट घेत त्यांना कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावर नातेवाईक शांत झाले. याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे.