अफगानिस्तानात तणाव वाढला; जिल्ह्यात ड्रायफ्रूट्स महागले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:22 AM2021-08-20T04:22:50+5:302021-08-20T04:22:50+5:30
परभणी : अफगानिस्तानात तणाव वाढल्याचा परिणाम जिल्ह्यातील ड्रायफ्रूट पुरवठ्यावर झाला असून दोन दिवसांपासून ड्रायफ्रूटचे दर ४० टक्क्यांनी वाढले आहेत. ...
परभणी : अफगानिस्तानात तणाव वाढल्याचा परिणाम जिल्ह्यातील ड्रायफ्रूट पुरवठ्यावर झाला असून दोन दिवसांपासून ड्रायफ्रूटचे दर ४० टक्क्यांनी वाढले आहेत.
जिल्ह्यात दिल्ली येथून ड्रायफ्रूटचा पुरवठा होतो. ठोक विक्रेते प्रत्येक आठ दिवसांचा मालाची मागणी नोंदवितात. बहुतांश ड्रायफ्रूट अफगानिस्तानातून आयात होतात. सध्या अफगानिस्तानात तणाव वाढल्याने व्यापार ठप्प झाला आहे. मालाची आवक होत नसल्याने त्याचा परिणाम जिल्हास्तरापर्यंत दरवाढीवर झाला आहे. त्यामुळे सर्वच ड्रायफ्रूटचे दर सर्वसाधारणपणे ४० टक्क्यांनी वाढले आहेत. आगामी काळात अशीच परिस्थिती राहिली तर हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
एक आठवड्याचाच स्टॉक शिल्लक
जिल्ह्यात सध्य आठवडाभर एवढाच ड्रायफ्रूटचा साठा शिल्लक आहे. पुढील मागणी व्यापाऱ्यांनी नोंदविली; परंतु अद्याप माल पुरवठा झाला नाही.
काजू वगळता इतर सर्व ड्रायफ्रूट दिल्ली येथून मागविले जातात. मात्र, चार-पाच दिवसांपासून पुरवठा झालेला नाही.
दर आठवड्याला ड्रायफ्रूटची मागणी नोंदविली जाते. ड्रायफ्रूटचे दर हे दिल्ली येथील दरांवर अवलंबून असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी या दरात बदल होतो. सध्या आठ दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. पुढील मागणी नोंदविली आहे. मात्र, अद्यापपर्यंत पुरवठा झाला नाही. त्यामुळे माल कधी येतो, याची प्रतीक्षा आहे.
- जगदीश सारडा, व्यापारी
आठवडाभरापासून ड्रायफ्रूटचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे शिल्लक असलेला माल विक्री केला जात आहे. नवीन मागणी नोंदविली; परंतु अद्याप तरी माल उपलब्ध झालेला नाही. सद्य:स्थितीला मागील आठवड्याच्या तुलनेत ड्रायफ्रूटचे दर वाढलेले आहेत. येत्या काळात ते आणखी वाढण्याची शक्यता दिसत आहे.
- अशोक जैन, व्यापारी