तीन राज्यात दहशत, आंतरराज्यीय गुन्हेगार चार पिस्तूल, काडतूसांसह अटकेत
By राजन मगरुळकर | Published: December 22, 2023 04:56 PM2023-12-22T16:56:15+5:302023-12-22T16:56:28+5:30
स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई; महाराष्ट्रासह तेलंगणा, कर्नाटकातही घरफोड्या
परभणी : पिस्तूलाच्या जोरावर धमक्या देणाऱ्या आरोपीला जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शोध घेऊन सिने स्टाईल पाठलाग करून गुरूवारी पकडले. त्याच्या घराची झडती घेतली असता चार पिस्तूल व सहा जिवंत काडतूस आढळून आले. हे सर्व साहित्य जप्त करून संबंधिताविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी, कोतवाली ठाण्याच्या हद्दीत कुरबान अलिशहा नगर भागात फिर्यादीच्या घरासमोर ३० नोव्हेंबरला सायंकाळी आरोपीने जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करीत आरोपीने त्याच्या जवळील पिस्टल काढून फिर्यादीस तेरे को जान से मार डालुंगा, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली होती. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांनी आरोपीस शोधण्याच्या सूचना स्थानिक गुन्हा शाखेला दिल्या. यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पथक नेमण्यात आले. २० डिसेंबरला आरोपी बाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जालना, छत्रपती संभाजी नगर येथे हे पथक रवाना झाले.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जालना व छत्रपती संभाजीनगर ते कोटमगाव (जि.नाशिक) असा चार तास शोध घेऊन पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपी खय्युम रफिक बेग (रा.परभणी) यास ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता तेथे सदरील साहित्य आढळले. त्यावरून संबंधितावर कोतवाली ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार, गोपीनाथ वाघमारे, पोलीस कर्मचारी बालासाहेब तुपसुंदरे, रवी जाधव, दिलावर खान पठाण, शेख रफिक, निलेश परसोडे, विलास सातपुते, मधुकर ढवळे, विष्णू चव्हाण, अंबादास गुंगे, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर यांनी केली.
विविध ठिकाणी केले गुन्हे
आरोपीने भरदिवसा घरफोडीचे अनेक गुन्हे केले. तो आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार आहे. परभणीसह राज्यात आणि तेलंगणा, कर्नाटक राज्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत दिवसा घरफोडी त्याने केल्या आहेत. या आरोपीने भर दिवसा घरफोडीचे अनेक गुन्हे केले असून तो आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार आहे. परभणीसह राज्यात आणि तेलंगणा, कर्नाटक राज्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत दिवसा घरफोडी त्याने केल्या आहेत.