परभणीत पहिल्यांदाच रंगणार ठाकरे शिवसेनाविरुद्ध रासपचा सामना; कोणाची किती ताकद?
By मारोती जुंबडे | Published: April 17, 2024 05:30 PM2024-04-17T17:30:14+5:302024-04-17T17:45:47+5:30
मतदार संघात महायुती अन् महाविकास आघाडीची ताकद तुल्यबळ असल्याने जोरदार लढत पाहायला मिळत आहे
परभणी : लोकसभा मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस हे पाच वेळेस एकमेकांसमोर आले. या लढतीमध्ये आजपर्यंत शिवसेनेने बाजी मारली. परंतु, आता पहिल्यांदाच लोकसभेच्या आखाड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेविरुद्ध राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारात लढत होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे १९९९ मध्ये स्थापना झाल्यानंतर पहिल्याच लोकसभेच्या निवडणुकीत सुरेश वरपूडकर यांनी राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरले होते. याशिवाय रावसाहेब जामकर काँग्रेसकडून होते. यावेळी शिवसेनेचे उमेदवार सुरेश जाधव यांनी जामकर यांचा ४३ हजार मतांनी पराभव केला होता. तर वरपुडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीची राज्यात आघाडी झाल्यानंतर परभणी मतदार संघ राष्ट्रवादीकडे गेला. त्यानंतर २००४, २००९, २०१४ अशी सलग तीन वेळा या मतदारसंघात राष्ट्रवादी- शिवसेना अशीच लढत झाली. यात प्रत्येक वेळी शिवसेनेने राष्ट्रवादीवर मात केली.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय जाधव यांना ५ लाख ३८ हजार ९४१ तर राष्ट्रवादीच्या विटेकर यांना ४ लाख ९६ हजार ७४२ एवढी मते मिळाली होती. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही विटेकरविरुद्ध जाधव असाच सामना रंगणार असल्याची अपेक्षा परभणीकरांना होती. मात्र ती फोल ठरली. शनिवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महायुतीने रासपकडून महादेव जानकर यांना संजय जाधव यांच्याविरुद्ध रणांगणात उतरवले.
महायुती अन् महाविकास आघाडीची ताकद
परभणी लोकसभा मतदार संघात परभणी, गंगाखेड, जिंतूर आणि पाथरी हे ४ विधानसभा मतदारसंघ परभणीत तर परतूर आणि घनसावंगी हे जालना जिल्ह्यात येतात. यातील महाविकास आघाडीचे आमदार असलेला परभणी शिवसेना (ठाकरे गट), पाथरीत सुरेश वरपुडकर काँग्रेस आणि घनसावंगीतून राजेश टोपे (शरद पवार राष्ट्रवादी) अशी ताकत आहेत. तर महायुतीकडे जिंतूर मेघना बोर्डीकर (भाजप), गंगाखेड रत्नाकर गुट्टे (रासप) अन् परतूरमध्ये बबनराव लोणीकर हे भाजप आमदार असे ३-३ विधानसभा मतदार संघ दोन्हीकडे आहेत.