अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून थाळीनाद; परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By मारोती जुंबडे | Published: January 17, 2024 03:17 PM2024-01-17T15:17:12+5:302024-01-17T15:17:23+5:30
अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून मानधनात वाढ करण्याची मागणी
परभणी: अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता तत्काळ करावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेच्या इमारतीपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळी नाद करत मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. या थाळी नाद निमित्त शासनाविरुद्ध मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मासिक पेन्शन, मानधनात वाढ करावी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युईटी देण्यात यावी नवीन चांगल्या दर्जाच्या मोबाईल देण्यात यावे जेवणाच्या आहाराचे दर वाढवावेत यासह इतर प्रमुख मागण्यासाठी मागील काही दिवसापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे संप सुरू आहे मात्र तरीही राज्य शासन व प्रशासन या संपाकडे या संपावर तोडगा काढत नसल्याने जिल्ह्यातील एक लाख बालकांसह गरोदर माता पोषण आहारापासून वंचित राहत आहेत.
त्यामुळे 17 जानेवारी रोजी राज्य शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी परभणी शहरातील जिल्हा परिषदेच्या कार्यालयापासून इमारतीपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महाराष्ट्राच्या अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन यांच्यावतीने मोर्चा काढण्यात आला या मोर्चादरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून थाळी नाद करण्यात आला त्याचबरोबर शासनाविरुद्ध घोषणा देत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चा आल्यानंतर प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.