अंगणवाडी सेविकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळीनाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 04:00 PM2017-09-26T16:00:43+5:302017-09-26T16:01:18+5:30
मागील १६ दिवसांपासून बेमुदत संपावर असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर थाळीनाद आंदोलन करुन शासनाविषयी रोष व्यक्त केला.
परभणी,दि.२६ : मागील १६ दिवसांपासून बेमुदत संपावर असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर थाळीनाद आंदोलन करुन शासनाविषयी रोष व्यक्त केला.
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका १६ दिवसांपासून संपावर गेल्या आहेत. मात्र, शासन जाणीवपूर्वक अंगणवाड्यांची हेळसांड करुन अंगणवाडी कर्मचा-यांना दुय्यम दर्जाची वागणूक देत असल्याचा आरोप थाळीनाद आंदोलना दरम्यान करण्यात आला. अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन, लालबावटाच्या वतीने दुपारी १२ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत थाळीनाद आंदोलन करीत मोर्चा काढण्यात आला.
यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येताच गेटसमोर जोरदार थाळीनाद करून शासनाविषयी रोष व्यक्त करण्यात आला. आंदोलनात संघटनेच्या अॅड.माधुरी क्षीरसागर, राजश्री गाडे, अर्चना कुलकर्णी, ताहेरा शेख मस्तान, अनुराधा थोरात, रेखा पानपट्टे, संजीवनी समुद्रे, अरुणा फड, कासाबाई कांबळे, प्रिया सूर्यवंशी, रत्नमाला कदम आदींसह जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका, अंगणवाडीतील लाभार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.