परभणी जिल्ह्याचा दहावीचा निकाल ५ टक्यांनी घसरला
By मारोती जुंबडे | Published: June 2, 2023 05:33 PM2023-06-02T17:33:09+5:302023-06-02T17:33:18+5:30
उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९०.४५ टक्के एवढा आहे. गतवर्षी जिल्ह्याचा दहावीचा निकाल हा ९५.३७ टक्के एवढा होता.
परभणी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला असून त्यात परभणी जिल्ह्याचा निकाल ९०.४५ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या निकालाच्या तुलनेत जिल्ह्याचा निकाल हा ५ टक्क्यांनी घसरला आहे. छत्रपती संभाजी नगर विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये परभणी जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे. बीड जिल्ह्याचा सर्वाधिक ९६. २४ टक्के निकाल असून विभागात प्रथम स्थानावर आहे.
२ जून रोजी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. परभणी जिल्ह्यातून २७ हजार ५८४ विद्यार्थांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २७ हजार २०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात ७४९६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत ८ हजार ६०१, द्वितीय श्रेणीत ६५८६, तृतीय श्रेणीत १९२८ असे एकूण २४ हजार ६११ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९०.४५ टक्के एवढा आहे. गतवर्षी जिल्ह्याचा दहावीचा निकाल हा ९५.३७ टक्के एवढा होता.
तालुक्याच्या निकालात गंगाखेड तालुक्याने बाजी मारली आहे. या तालुक्याचा निकाल ९२.६० टक्के एवढा लागला आहे. त्या पाठोपाठ पूर्णा तालुका ९१.६५, जिंतूर ९१.२५,सोनपेठ ९०.८६, परभणी ९०.८४, पालम ८७.८२, पाथरी ८८.९३, मानवत ८७.३४ तर सेलू ८७.४८ एवढा निकाल लागला आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात मानवत तालुक्याचा निकाल मात्र सर्वात कमी ८७.३४ टक्के एवढा लागला आहे. जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत निकालाची टक्केवारी घटली आहे. विशेष म्हणजे उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये विशेष प्राविण्यासह तसेच प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्या सर्वात कमी असल्याचे दिसून येत आहे.
गतवर्षीच्या तुलनेत निकाल पाच टक्क्यांनी घटला
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. यामध्ये परभणी जिल्हा छत्रपती संभाजी नगर विभागात चौथ्या स्थानावर अबाधित राहिला असला तरी निकाल मात्र पाच टक्क्यांनी घटला आहे. २०२२-२३ या वर्षीचा निकाल हा ९०.४५ टक्के एवढा लागला आहे. तर दुसरीकडे गतवर्षी परभणी जिल्ह्याचा निकाल हा ९५.३७ टक्के एवढा लागला होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीचा जिल्ह्याचा निकाल हा ५ टक्क्यांनी घट झाली असल्याचे दिसून येत आहे.
यंदाही मुलीच आघाडीवर
दहावी, बारावी परीक्षेच्या निकालात मागील अनेक वर्षापासून मुलांच्या तुलनेत मुलीचे यश अधिक असल्याचे सिद्ध होत आहे. यावर्षी देखील हीच पुनरावृत्ती झाली. जिल्ह्यात १२ हजार ३८८ मुली परीक्षेसाठी पात्र ठरल्या होत्या. त्यापैकी ११ हजार ६१५ मुली उत्तीर्ण झाल्या असून त्याची टक्केवारी ही ९३.७६ टक्के एवढी आहे. तर दुसरीकडे १४ हजार ८२० मुले परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी १२ हजार ९९६ मुलांनी परीक्षा दिली. त्याची टक्केवारी ही ८७.६९ टक्के एवढी आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून दहावी व बारावीच्या निकालामध्ये जिल्ह्यात मुलीच प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरत असल्याचे दिसून येत आहेत.