जामीन मिळून देण्यासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षकाने घेतली लाच
By राजन मगरुळकर | Published: January 21, 2023 06:29 PM2023-01-21T18:29:06+5:302023-01-21T18:29:11+5:30
सहायक पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत रंगनाथराव राऊत (५६) असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे.
परभणी : तक्रारदार व त्यांच्या मुलावर, भावावर पाथरी ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यामध्ये जामीन मिळून देण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षकाने तक्रारदाराकडे २० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. यामध्ये पथकाने शनिवारी लाच मागणी पडताळणी सापळा रचून सहायक पोलीस उपनिरीक्षकाला दहा हजारांची लाच घेताना ताब्यात घेतले.
सहायक पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत रंगनाथराव राऊत (५६) असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. सूर्यकांत राऊत हे सध्या पाथरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. पाथरी ठाण्यात तक्रारदार तसेच त्यांचा मुलगा व त्यांच्या भावावर २०२२ मध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यामध्ये तक्रारदार, त्यांच्या मुलाला व भावाला जामीन मिळून देण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी आरोपी लोकसेवक राऊत यांनी २० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
लाच मागणी पडताळणीत आरोपी ताब्यात
याबाबतची तक्रार परभणीच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने शुक्रवारी केली. त्यानुसार लाच मागणी पडताळणी सापळा शनिवारी करण्यात आला. यामध्ये आरोपी लोकसेवकाने दहा हजार रुपयांची लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वतः स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पथकाने आरोपी लोकसेवकास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे, पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे, पोलीस निरीक्षक जकीकोरे, अनिल कटारे, जनार्दन कदम, अतुल कदम, मुख्तार शेख, विकास तायडे यांनी केली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे करीत आहेत.