खेळता खेळता अचानक गायब झाला; दोन दिवसांपासून बेपत्ता मुलाचा मृतदेह विहिरीत आढळला
By मारोती जुंबडे | Published: January 23, 2024 05:46 PM2024-01-23T17:46:47+5:302024-01-23T17:48:03+5:30
अकरा वर्षीय मुलाचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू; ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
परभणी : शनिवारपासून बेपत्ता झालेल्या एका अकरा वर्षीय मुलाचा मृतदेह परभणी तालुक्यातील पान्हेरा शिवारात एका विहिरीमध्ये सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास आढळून आला. विहिरीच्या पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धीरज जयराम घुले (११) असे मृत मुलाचे नाव आहे. २० जानेवारी रोजी दुपारी धीरज हा खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. मात्र, तो शनिवारी रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यानंतर कुटुंबीयांकडून त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, तो मिळून आला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी परभणी ग्रामीण पोलिसांत धाव घेतली. जयराम घुले यांनी याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरू केला.
यादरम्यान मुलांच्या मित्रांनी धीरज हा खेळत असताना शौचालयाला गेला होता, असे सांगितले. त्यानंतर कुटुंब व पोलिसांकडून धीरजची शोधा-शोध सुरू केली. तेव्हा २२ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास धीरजचा मृतदेह पान्हेरा शिवारातील विहिरीत आढळून आला. विहीर न दिसल्याने विहिरीत पडून धीरजचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक स्वाती कावळे ह्या करत आहेत.