बहिणीची छेड काढल्याचा केला बनाव करत सराफा व्यापाऱ्याचे १३ लाखांचे दागिने लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 12:55 PM2022-01-21T12:55:52+5:302022-01-21T12:56:44+5:30
गंगाखेडजवळील प्रकारात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
गंगाखेड (जि. परभणी) : गंगाखेडहून परभणीकडे जाणाऱ्या एका सराफा व्यापाऱ्यास अडवून त्याला चाकूचा धाक दाखवत १३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने दोन चोरट्यांनी लांबविल्याची घटना १९ जानेवारी रोजी रात्री ८.३० च्या सुमारास गंगाखेड- परभणी रस्त्यावरील खळी पाटीजवळ घडली.
जिंतूर येथील सचिन रघुनाथ टाक हे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा होलसेल व्यवसाय करतात. तालुक्याच्या ठिकाणी जाऊन व्यापाऱ्यांना ते दागिने पुरवितात. १९ जानेवारी रोजी ते दिवसभर गंगाखेड येथील बाजारपेठेत व्यवसायाच्या निमित्ताने फिरले. सायंकाळी एका खासगी प्रवासी वाहनात बसून ते परभणीकडे निघाले होते. याच दरम्यान, पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी हे खासगी प्रवासी वाहन अडविले. सचिन टाक यांना खाली बोलावून चाकूचा धाक दाखवित. त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. दरम्यान, याप्रकरणी बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास सचिन टाक यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गळ्याला चाकू लावून चोरट्यांनी बॅगमधील ३५० ग्राॅमचे सोन्याचे कुंदन, बाळ्या, डोरले, ओम असे १२ लाख ७४ हजाराचे सोन्याचे दागिने व ८८ हजार रोख रक्कम चोरट्यांनी लांबविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून गुन्हा नोंद झाला आहे.
बहिणीची छेड काढल्याचा केला बनाव
सचिन टाक हे ज्या खासगी वाहनाने परभणीकडे निघाले होते, नेमके तेच वाहन चोरट्यांनी मोटारसायकल आडवी लावून थांबविले. वाहन थांबविल्यानंतर सचिन खुडे यांना खाली ओढले. आमच्या बहिणीची याने छेड काढली आहे. तुमचा काहीही संबंध नाही, असे इतर प्रवाशांना सांगत त्यांनी टाक यांना खाल उतरवून वाहनास पुढे जाण्यास सांगितले. त्यानंतर टाक यांच्या गळ्याला चाकू लावून सोन्याची लूट केली.