सायंकाळी गुरे चरून घरी परतली पण मुले नाही; शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

By मारोती जुंबडे | Published: January 19, 2024 05:07 PM2024-01-19T17:07:18+5:302024-01-19T17:07:38+5:30

दोन्ही मुले गावातीलच शाळेत दहावी वर्गात शिक्षण घेत होते

The cattle went to graze and lost their lives; Two died after drowning in the farm lake | सायंकाळी गुरे चरून घरी परतली पण मुले नाही; शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

सायंकाळी गुरे चरून घरी परतली पण मुले नाही; शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

परभणी : गुरे चारण्यासाठी गेलेल्या दोन पंधरा वर्षीय मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात असलेल्या शेततळ्यात १८ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. यातील मयत कृष्णा पौळ याचा मृतदेह गुरुवारी रात्री तर ओम कंधारे याचा मृतदेह शुक्रवारी १० वाजेच्या सुमारास आढळला. मयत दोन्ही मुले सायाळा खटिंग येथील रहिवासी आहेत. 

कृष्णा बालासाहेब पौळ (१५) व ओम बाबूराव कंधारे (१५) असे मयत मुलांची नावे आहेत. दोन्ही मुले गुरुवारी गुरे घेऊन चारण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात गेली होती. सायंकाळच्या सुमारास जनावरे घरी परत आली; परंतु, मुले आली नाहीत. थोड्या वेळाने ही मुले घरी येतील, असा कुटुंबांचा समज झाला; परंतु, रात्री उशिरापर्यंत ही मुले घरी परतली नाहीत. त्यामुळे कुटुंबासह ग्रामस्थांनी मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी वनामकृ विद्यापीठातील शेततळ्यात कृष्णा पौळचा मृतदेह गुरुवारी रात्री दिसून आला.त्यानंतर कृष्णाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी पहाटेपासून शेततळ्यात ओम याचा शोध घेण्यास सुरुवात झाली.

शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ओम कंधारे याचा मृतदेह मिळून आला. या शोध मोहीमसाठी शहर महापालिका अग्निशमनचे गौरव देशमुख, संतोष पोंदाळ, मदन जाधव यांनी शोध मोहीम राबविली. घटनास्थळी नवा मोंढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंडे, पोहेकॉ. गुलाब भिसे, प्रदीप रणमाळ यांची उपस्थिती होती. याप्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, ही दोन्ही मुले पोहण्यासाठी शेततळ्यात उतरली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने या मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची शक्यता घटनास्थळी वर्तवली जात होती. या प्रकरणाचा अधिक तपास गुलाब भिसे हे करीत आहेत. या घटनेने सायाळा खटिंग गावावर शोककळा पसरली.

दोघेही दहावीत शिक्षण घेत होते
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात असलेल्या सायाळा खटिंग येथील कृष्णा पौळ हा कुटुंबाला एकुलता एक होता. तर ओम कंधारे याला एक लहान भाऊ आहे. दोन्ही मुले गावातील स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयात शिक्षण घेत होती; परंतु, गुरुवारी ही दोन्ही मुले गुरे चारण्यासाठी विद्यापीठ परिसरात गेली. या परिसरात असलेल्या शेततळ्यात पोहण्यासाठी उतरली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Web Title: The cattle went to graze and lost their lives; Two died after drowning in the farm lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.