मोठी दुर्घटना टळली! चालकाला डुलकी लागली अन् गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक उलटला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 01:17 PM2023-09-05T13:17:25+5:302023-09-05T13:19:27+5:30
घटनेची माहिती मिळताच पाथरी नगरपालिकेचे अग्नीशामक दल घटनास्थळी पोहचले.
पाथरी: चालकाला झोप लागल्याने घरगुती वापराची गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक रस्त्याखाली जात उलटला. हा अपघात आज ( दि. ५) सकाळी ६ वाजेच्या सुमारास तालुक्यातील खेर्डा पाटीजवळ घडला.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथून एक ट्रक (क्रमांक एमएच ४४ यु ५७२५ ) एचपी कंपनीचे गॅस सिलेंडर घेऊन पालम कडे जात होता. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रं ६१ वर तालुक्यातील खेर्डा पाटीजवळ चालकाला झोप लागल्याने ट्रक रस्ता सोडून खाली उतरत उलटला. गाडीतील सर्व सिलेंडर गॅसने भरलेले होते. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच पाथरी नगरपालिकेचे अग्नीशामक दल घटनास्थळी पोहचले. जखमी झालेल्या ट्रक चालकाला पाथरी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.