चालकानेच साधला डाव; साथीदारांच्या मदतीने मुनिमाची कार रस्त्यात अडवून लुटले ४ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 06:19 PM2022-07-27T18:19:15+5:302022-07-27T18:19:40+5:30
चालकाने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने कट रचून निर्जन ठिकाणी कार अडवून लुटली रक्कम
सोनपेठ (परभणी): व्यापाऱ्याची उधारीची रक्कम वसुली करून परतणाऱ्या मुनीम आणि वॉचमन यांची कार रस्त्यात दुचाकी आडवी लावून थांबवत चार लाखांची रक्कम लुटल्याची घटना 26 जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला असून मुनीम आणि वॉचमन ज्या कारमध्ये होते त्याच्या चालकानेच हा लुटीचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन रक्कम जप्त केली आहे.
परळी येथील व्यापारी विष्णू देवसटवार यांचा मुनीम व वॉचमन हे गंगाखेड येथे कारने ( एम एच 44 झेड 6544 ) वसुलीसाठी आले होते. चार लाखांची रक्कम वसूल करून गंगाखेडहून मुनीम वॉचमनसह परळीकडे परतत होते. दरम्यान, गंगाखेड-परळी रोडवरील करम पाटी येथे कारच्या समोर अचानक एक दुचाकी आडवी लावण्यात आली. यानंतर दुचाकीवरील दोघांनी गाडीतील मुनीम व वॉचमनला मारहाण केली. त्यांच्याजवळील ४ लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून घेऊन दोघे दुचाकीवरून पळून गेले. याप्रकरणी विष्णू देवसटवार यांच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलीस ठाण्यात 27 जुलै रोजी अज्ञात दोन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तपास करत कारचा चालक मयुर मोरे ( रा. मुंगी ता. परळी ) यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत मोरेने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून लुटलेले ४ लाख रुपये आरोपी सचिन सोळंके याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहेत. आणखी एक आरोपी फरार असून पोलिसांनी गुन्हात वापरलेले वाहन ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सपोनी संदिप बोरकर, एएसआय कुलकर्णी, कुंडलीक वंजारे, शिवाजी जाधव आदीनी केली.