चालकाने मद्यपान करून ट्रक भरधाव पळवला; काही वेळाने अपघात होऊन क्लीनरने जीव गमावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 06:26 PM2022-01-21T18:26:35+5:302022-01-21T18:29:11+5:30
साखरेचे पोते अंगावर पडल्याने क्लीनर त्याखाली दबला गेला
पाथरी ( परभणी ) : भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना आज दुपारी पोहेटाकली गोलाई रस्त्यावर घडली. अपघातात ट्रकमधील साखरेच्या पोत्याखाली दबल्याने क्लीनरचा मृत्यू झाला. तब्बल पाउण तास नागरिकांनी क्लीनरला सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश आले. दरम्यान, चालक मध्यपान करून ट्रक चालवत होता.
अंबड - नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर पाथरीकडून परभणीच्या दिशेने साखरेचे पोते घेऊन एक ट्रक ( एमएच 15 सीके 0519 ) जात होता. या ट्रकच्या चालकाने मद्य प्राशन केले होते. काही अंतरावर जाताच पोहेटाकळीजवळ त्याचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या खाली जात उसाच्या शेतात उलटला. यावेळी ट्रकमधील साखरेचे पोते केबिनवर गेले आणि त्याखाली क्लीनर ज्ञानेश्वर शिवाजी पावडे ( 45, रा. झरी ता परभणी ) दबला गेला. अंगावर पोते पडल्याने तो वाचवावाचवा असा ओरडत होता.
आवाज ऐकून रस्त्यावरील नागरिकांनी क्लीनरला बाहेर काढण्याचे आटोकाट प्रयत्न केले. तब्बल पाऊण तासानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आले. मात्र, उपचारासाठी पाथरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तपासून मृत घोषित करण्यात आले. चालक सुखरूप असून घटनास्थळी तो मद्यधुंद अवस्थेमध्ये आढळून आला.