स्वातंत्र्य दिनापासून अख्खे गावच बसले उपोषणाला; दोन दिवसांनंतरही प्रशासन फिरकलेच नाही
By मारोती जुंबडे | Published: August 17, 2024 04:21 PM2024-08-17T16:21:42+5:302024-08-17T16:22:40+5:30
स्मशानभूमी, नवीन रस्त्यासह शाळा बांधकाम करण्याची मागणी; दोन दिवसांनंतरही प्रशासन फिरकलेच नाही
परभणी : आमच्या मुलांना शिक्षणासाठी नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम करावे, यासाठी पाच वर्षांपासून प्रशासनाचे उंबरवठे झिजवूनही न्याय मिळत नसल्याने स्वातंत्र्य दिनापासून परभणी तालुक्यातील सुकापूरवाडी येथील ग्रामस्थ थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोरच आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र, उपोषणाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत एकही अधिकारी वा कर्मचारी या गावाकडे फिरकले नसल्याने उपोषणकर्त्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
परभणी तालुक्यातील सुकापूरवाडी हे गाव सहाशे लोकसंख्येचे असल्याने ३१५ मतदार आहेत. त्यामुळे राज्यकर्त्यांचे या गावाकडे मूलभूत सोयी सुविधांसाठी अक्ष्यम दुर्लक्ष झाले आहे. ७८ वर्षांपासून गावाला रस्ता नसल्याने चिखलातूनच या ग्रामस्थांना मार्गक्रमण करावे लागते. त्यातच किमान आपल्या लेकरांना तरी सुसज्ज वर्ग खोल्यांमध्ये बसून अध्ययन करता यावे, यासाठी सहा वर्षांपासून शिक्षण विभागासह जिल्हा प्रशासनाला नवीन वर्गखोल्यासाठी निवेदने व तक्रारी करून साकडे घातले. मात्र, प्रशासनाकडून राज्यकर्त्यांप्रमाणेच कानाडोळा करण्यात येत आहे. त्यामुळे चार दिवसांपूर्वी या ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसह थेट शिक्षण विभाग गाठून तेथेच विद्यार्थ्यांची शाळा भरवली. त्यानंतर १५ ऑगस्टपर्यंत प्रशासनाकडून हालचाली केल्या नाही, तर गावातच उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा दिला. मात्र, कोणतेही नियंत्रण राहिले नसलेल्या प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, स्वातंत्र्य दिनापासून सुकापूरवाडी ग्रामस्थांनी गावाला पाच किलोमीटरचा नवीन रस्ता मंजूर करावा, त्याचबरोबर गावच्या शाळेचे बांधकाम करावे या दोन प्रमुख मागण्यांसाठी ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात विद्यार्थी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. गुरुवारपासून सुरू झालेल्या या उपोषणाकडे शुक्रवारीही प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे या ग्रामस्थांमधून प्रशासनाच्या धोरणाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्मशानभूमीसाठीही संघर्ष
मूलभूत सुविधांपासून सुकापूरवाडी ग्रामस्थ ७८ वर्षांपासून वंचित आहेत. शाळा रस्ता याबरोबरच गावाला स्मशानभूमीही नाही. त्यामुळे ग्रामस्थांना मूलभूत सोयी पुरवण्यात प्रशासन व शासन अपयशी ठरले. त्यामुळे सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत संघर्ष हा या ग्रामस्थांच्या पाचवीलाच पूजलेला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.