आरक्षणाची मागणी; तहसीलमध्ये कामकाज सुरू असताना बाहेरून कडी लावत पेटवले प्रवेशद्वार
By ज्ञानेश्वर भाले | Published: November 1, 2023 05:39 PM2023-11-01T17:39:31+5:302023-11-01T17:46:48+5:30
कर्मचारी तहसील कार्यालयात कामकाज करत असताना आक्रमक आंदोलन
परभणी :मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेदिवस तीव्र होत असल्याची जिल्ह्यात स्थिती आहे. आत्महत्येच्या सत्रानंतर बुधवारी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, अशा घोषणा देत पूर्णा तहसील कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. संबंधित घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली असून याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात २६ ऑक्टोबरपासून उपोषण, आंदोलने करण्यात येत आहे. परंतु, सरकार पातळीवर याबाबत ठोस निर्णय हाेत नसल्याने मराठा समाज बांधवाच्या संयमाचा बांध आता फुटत असल्याचे पुढे येत आहे. त्यातच बुधवारी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ तरुणांनी पुर्णा तहसील कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वारे पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. यासह काही दिवसांपुर्वी जिल्ह्यातील आजी, माजी आमदारांना मराठा समाज बांधवाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यानंतर आतापर्यंत जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चार जणांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून आंदोलनकर्ते आक्रमक भूमिका घेत असल्याची स्थिती असून ठिकठिकाणी रस्ता रोको, जाळपोळ होत असल्याचे पुढे येत आहे.
बाहेरुन लावली कडी
बुधवारी सकाळी नियमितपणे कर्मचारी तहसील कार्यालयात कामकाज करत हाेते. यादरम्यान सकाळी साडेअकराला काही तरुणांनी पेट्रोलने भरलेल्या प्लास्टिक पिशव्या तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर फेकत आग लावली. कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. याप्रकरणी तहसीलदार माधवराव बोथीकर म्हणाले की, तहसीलचे प्रवेशद्वार अज्ञातांकडून जाळण्याचा प्रयत्न झाला असून यादरम्यान प्रवेशद्वारला बाहेरून कडी लावण्यात आली होती.