जगाचा पोशिंदा पाच दिवसांआड घेतोय गळफास; परभणी जिल्ह्यातील धक्कादायक चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 02:15 PM2023-04-25T14:15:42+5:302023-04-25T14:15:42+5:30
कोसळलेले भाव, दुष्काळ ठरताहेत शेतकरी आत्महत्येची कारणे
परभणी : पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न या काळात दुप्पट झाले की नाही, हा मंथनाचा विषय असला तरी दुसरीकडे मात्र परभणी जिल्ह्यात जगाचा पोशिंदा म्हणून संबोधल्या जाणारा बळीराजा ५ दिवसांआड आपले जीवन संपवत असल्याची विदारक स्थिती जिल्ह्यात दिसून येत आहे. मात्र, ही स्थिती बदलण्यासाठी प्रशासन स्तरावर आवश्यक ते बदल होत नसल्याचे दिसून येत आहे.
शासन-प्रशासनाकडून विविध विभागांद्वारे योजनांची जंत्री शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित बियाणे वितरण, कृषी अवजारे, सिंचन साधनांना अर्थसहाय्य आदी योजना राबविण्यात येतात. त्यातच २०१४ मध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा नारा दिला. मात्र, हे आश्वासन देऊन ८ वर्षे उलटले. परंतु, शेतकऱ्यांची परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याचे दिसून येते. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत बळीराजा कष्टाने शेतमाल उत्पादित करतो. मात्र, त्या शेतीमालाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही, अशा परिस्थितीत शेतीमधून शेतकऱ्यांना स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल, एवढी देखील कमाई मागील काही दिवसांपासून होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच यावर्षी सध्या कापसाला ८ हजार रुपये तर सोयाबीनला ५ हजार रुपये मिळणारा हा दर पिकांवर केलेला खर्चापेक्षा कितीतरी पटीने कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावे कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे.
तर दुसरीकडे या प्रश्नावर लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करत नसल्याने शेतकरी पुरता खचला आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत जिल्ह्यातील १८ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. याचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये दर ५ दिवसाला बळीराजा आपल्या गळ्याला फास घेत आहे. त्यामुळे बळीराजाचे जीवन स्वस्त झाले आहे की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
मदतीसाठीही कोतेपणा?
जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत जिल्ह्यात १८ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यामध्ये जानेवारीत ६, फेब्रुवारी ६ व मार्च महिन्यात ६ जणांनी बाजारभाव, नापिकी, दुष्काळ, वेळेत न मिळणारे पीक कर्ज यासह विविध कारणांनी गळफास लावत आपले जीवन संपविले आहे. शेतकरी हा कुटुंबातील कर्ता असल्याने त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे या शेतकऱ्याच्या कुटुंबाला प्रशासनाने तत्काळ मदत देणे गरजेचे होते. परंतु, आतापर्यंत केवळ ६ शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत. त्यातील २ शेतकरी अपात्र ठरले असून, चौकशीसाठी १० प्रकरणे प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे या तीन महिन्यांत अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याला मदत देण्यात आलेली नाही, हे वास्तव आहे.
गतवर्षी ७७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
परभणी जिल्ह्यातील जमीन ही सुपीक आणि काळी कसदार असली तरी मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र बदलून टाकले आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीन, कापूस आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करतो. परंतु, ही पिके काढणीला आलीच की अतिवृष्टी, सततचा पाऊस, वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतो. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आत्महत्या शिवाय पर्याय उरत नसल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत जिल्ह्यात ७७ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. त्यातील ६७ शेतकरी राज्य शासनाच्या १ लाख रुपयांचे मदत देण्यात आले. यातील १० प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे त्यातही १६ प्रकरणे मदतीसाठी प्रलंबित असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालावरून दिसून येत आहे.
आत्महत्येची कारणे
-सिंचनाचा अभाव
-सततचे भारनियमन
-उत्पादनातील घट
-बाजारात कोसळलेले भाव
-बदलते हवामान
-सिंचनाचा अभाव
-सावकारी कर्जाचा डोंगर
-परतफेडीसाठी तगादा