भरधाव टेम्पोने बुलेटस्वारास चिरडले; गंगाखेडच्या सराफा व्यापाऱ्याचा परळीत अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2024 11:14 AM2024-12-07T11:14:59+5:302024-12-07T11:16:25+5:30
तुकाराम मुंडीक यांच्या मृत्यूची वार्ता समजताच शहरातील सराफा बाजारात शोककळा पसरली आहे.
- प्रमोद साळवे
गंगाखेड : भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील शहरातील सराफा व्यापारी तुकाराम विठोबा मुंडीक (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री ९:३० वाजेच्या दरम्यान बीड जिल्ह्यातील नाथ्रा ( ता.परळी) परिसरातील आघाव पेट्रोल पंपा नजीक झाला. मुंडीक यांच्या मृत्यूची वार्ता समजताच शहरातील सराफा बाजारात शोककळा पसरली आहे.
याबाबतची प्राप्त माहिती अशी, शहरातील सराफा व्यापारी तुकाराम विठोबा मुंडीक (मूळ रा.खोकलेवाडी ता.गंगाखेड) हे शुक्रवारी रात्री गंगाखेडहून बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथे नातेवाईकांकडे जात होते. रात्री ९:३० वाजेच्या दरम्यान नाथ्रा ( ता.परळी) परिसरातील आघाव पेट्रोलपंपा नजीक मुंडीक यांच्या बुलेटला ( क्र. एमएच २२- ऐजे ७०५९) एका अज्ञात टेम्पोने जोरदार धडक दिली. यात व्यापारी तुकाराम मुंडीक यांचा जागीच मृत्यू झाला.
आज सराफा बाजार बंद राहणार
मयत व्यापारी तुकाराम मुंडीक यांच्या पार्थिवावर शनिवारी दि.७ रोजी गंगाखेड तालुक्यातील खोकलेवाडी येथे सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. मुंडीक यांच्या मृत्यूने शहरातील सराफा बाजारावर शोककळा पसरली असून आज, शनिवारी बाजारपेठ बंद राहणार असल्याचे व्यापारी संघटनेच्यावतीने कळविण्यात आले आहे. मयत तुकाराम मुंडीक यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.