फ्लॅश लाइटमुळे चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रॅक्टर-ट्रॉलीसह २० फूट नदीत कोसळले
By मारोती जुंबडे | Updated: January 9, 2024 19:25 IST2024-01-09T19:25:04+5:302024-01-09T19:25:41+5:30
प्रत्यक्षदर्शींनी जखमी वाहनचालकाला पालम येथे उपचारासाठी रवाना केले

फ्लॅश लाइटमुळे चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रॅक्टर-ट्रॉलीसह २० फूट नदीत कोसळले
पालम : शहरापासून जवळच असलेल्या पालम-लोहा रस्त्यावरील नदीच्या पुलावरून ट्रॅक्टर उलटून अपघात झाला. ही घटना मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. त्यात ट्रॅक्टरचालक जखमी झाला.
लोहा तालुक्यातील अंतेश्वर येथील शेतकरी छत्रपती पिराजी कराळे यांचा ट्रॅक्टर (एमएच२६ बीसी ०४८०) कारखान्याला ऊस पुरवठा करतो. मंगळवारी तो गंगाखेड येथे ऊस घेण्यासाठी अंतेश्वरकडे निघाला. दरम्यान, पालम शहरालगतच्या पुलावर आले असता समोरील वाहनाच्या लाईटच्या प्रकाशामध्ये वाहनचालकाला पुलाचा अंदाज आला नाही.
शिवाय, पुलाचे कठडे उभे न दिसल्याने ट्रॅक्टर थेट पुलावरून २० फूट नदीमध्ये कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये चालक तुकाराम रामदास कराळे (वय ३२, रा. अंतेश्वर) जखमी झाला. प्रत्यक्षदर्शींनी वाहनचालकाला पालम येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लोहा येथे पाठविले. येथील पुलाला कठडे नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.