कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा; बारावीच्या पहिल्याच पेपरला एकाच केंद्रावर २० जणांना पकडले
By मारोती जुंबडे | Published: February 21, 2024 06:44 PM2024-02-21T18:44:01+5:302024-02-21T18:44:30+5:30
गत काही वर्षांपासून राज्यभरात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे; मात्र जिल्ह्यात त्याचा फज्जा उडत असल्याने यंदा जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
परभणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बुधवारपासून बारावीची परीक्षा घेण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात ६९ परीक्षा केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी इंग्रजी पेपरसाठी २६५६७ विद्यार्थी बसणार होते. त्यापैकी २५६१४ जणांनी हा पेपर दिला. मात्र गंगाखेड तालुक्यातील इसाद येथील बालाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सेंटरवर तब्बल २० विद्यार्थ्यांना काॅपी करताना पकडण्यात आले. त्यामळे या केंद्रावरील कर्मचाऱ्यावर नव्या नियमानुसार कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
गत काही वर्षांपासून राज्यभरात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे; मात्र जिल्ह्यात त्याचा फज्जा उडत असल्याने यंदा जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रामुख्याने दहावी, बारावी परीक्षेदरम्यान ज्या केंद्रावर कॉपी प्रकरणे आढळून येतील, त्या ठिकाणचे पर्यवेक्षक, केंद्रचालक तसेच बैठ्या पथकातील कर्मचाऱ्यांची एक वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयामुळे बारावीसह दहावीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियानाला एका प्रकारे बळ मिळणार असल्याचे दिसून येत होते. मात्र बुधवारपासून शिक्षण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील ६९ केंद्रांवर परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे बुधवारी विद्यार्थ्यांनी केंद्राबाहेर सकाळी ९.३० पासूनच गर्दी केली होती. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळली जावी, म्हणून अनेक केंद्रावर त्यांना वेळेपूर्वीच वर्गात प्रवेश देण्यात आला. जिल्ह्यातील ६९ केंद्रावर २६ हजार ५६७ पैकी २५ हजार ६१४ विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिला. यावेळी परीक्षा केंद्रावर बैठे पथकासह भरारी पथके शिक्षण मंडळाच्या वतीने स्थापन करण्यात आली आहेत. मात्र गंगाखेड तालुक्यातील इसाद येथील श्री बालाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सेंटरवर तब्बल २० विद्यार्थ्यांना काॅपी करताना पकडण्यात आले. त्यामळे परीक्षेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात कॉपीमुक्त आभियानाचा फज्जा उडाला आहे.
पहिल्याच दिवशी ९५३ विद्यार्थ्यांनी दांडी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बुधवारपासून बारावीची परीक्षा घेण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात ६९ परीक्षा केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी इंग्रजी पेपरसाठी २६५६७ विद्यार्थी बसणार होते. त्यापैकी २५६१४ जणांनी हा पेपर दिला असून, पहिल्याच दिवशी ९५३ विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याचे शिक्षण विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
९६ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस
कॉपीमुक्त अभियान सक्षमपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी यांच्या पथकासह विविध पथके नियुक्त करण्यात आली. त्यात प्रामुख्याने उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांच्यासह आदी भरारी पथके परीक्षा केंद्रांना वारंवार भेट देत कॉफी मुक्त अभियान राबविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, दुसरीकडे गंगाखेड तालुक्यातील ९६ शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, त्यांनी आपले कर्तव्य बजावले नसल्याचे पुढे आले. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी यांनी या ९६ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.