पहिलीच्या प्रवेशासाठी मुख्याध्यापक, लिपिकाने घेतली लाच; ‘एसीबी’ने केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 03:44 PM2023-07-04T15:44:30+5:302023-07-04T15:47:44+5:30
‘एसीबी’ने लिपिक आणि मुख्याध्यापक या दोघांविरुद्ध कारवाई करून ताब्यात घेण्यात आले.
परभणी : मुलीच्या पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी मुख्याध्यापकासह लिपिकाने तक्रारदाराला साडेसात हजारांच्या लाचेची मागणी केली होती. यामध्ये तक्रारीवरून एसीबी पथकाने सोमवारी सापळा रचला. यामध्ये पडताळणीत लिपिकाने चार हजारांची लाच स्वीकारली व अजून दीड हजार दोन महिन्यांनी आणून देण्याचे सांगितले. त्यामुळे साडेपाच हजारांची लाच तडजोडीअंती मागणी केल्याने लिपिक आणि मुख्याध्यापक या दोघांविरुद्ध कारवाई करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी परभणीत ही कारवाई केली. यामध्ये तक्रारदार यांच्या मुलीचे पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी नानलपेठ भागातील बालविद्यामंदिर माध्यमिक शाळेतील लिपिक मोहम्मद अब्दुल रफी मोहम्मद अब्दुल रशीद व प्राथमिकचे मुख्याध्यापक एकनाथ कच्छवे यांनी तक्रारदाराकडे सात हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच पडताळणीत आरोपी लोकसेवक यांनी तडजोडीत साडेपाच हजार रुपये पंचांसमक्ष लाच मागणी केली. त्यापैकी चार हजारांची लाच सोमवारी मोहम्मद अब्दुल रफी मोहम्मद अब्दुल रशीद यांच्याकडे देण्यास कच्छवे यांनी सांगितले. उर्वरित रक्कम दोन महिन्यांनंतर आणून देण्यास सांगितले.
कारवाईमध्ये मोहम्मद अब्दुल रफी मोहम्मद अब्दुल रशीद याने चार हजारांची लाच पंचांसमक्ष स्वीकारली. त्यास पथकाने ताब्यात घेतले. यासह मुख्याध्यापक कच्छवे यांनाही एसीबी पथकाने ताब्यात घेतले. सदरीलप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नानलपेठ ठाण्यात सुरू आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली बसवेश्वर जकीकोरे, कर्मचारी मिलिंद हनुमंते, चंद्रशेखर निलपत्रेवार, अतुल कदम, मोहम्मद जिब्राईल यांनी केली.