संध्याकाळी अटक केलेला खुनातील मुख्य आरोपी पहाटे झाला फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 03:14 PM2022-09-03T15:14:56+5:302022-09-03T15:15:33+5:30
पोलिसांची वेगवेगळी पथके घेत आहेत शोध
मानवत (परभणी) : तालुक्यातील सोमठाणा येथील खून प्रकरणात शुक्रवारी संध्याकाळी अटक केलेला आरोपी आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यातून फरार झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांची पथके आरोपीच्या शोधात रवाना झाली आहेत.
तालुक्यातील सोमठाणा येथील ५८ वर्षीय तुकाराम निर्वळ यांचा शेती खरेदीच्या वादातून लाठ्या काट्याने मारहाण करून खून झाला होता. याप्रकरणी आठ जणांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात शुक्रवारी २ सप्टेंबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात मुख्य आरोपी असलेला मृताच सावत्र भाऊ छत्रपती निर्वळ याला पोलिसांनी लागलीच अटक केली.
आरोपीस लॉकअप क्रमांक २ मध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, आज पहाटे आरोपी निर्वळने तब्येत बरोबर नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला लॉकअपच्या बाहेर लोखंडी जाळी असलेल्या ठिकाणी ठेवले. याचाच फायदा घेत आरोपी पोलिसांची नजर चुकवून लोखंडी जाळीवरून उडी मारत फरार झाला. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह मानवत पोलिसांचे तीन पथके आरोपीच्या शोधात रवाना झाले आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी अविनाश कुमार पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहेत.
आठ आरोपी पैकी एक अटक पण तोही झाला फरार
तालुक्यातील सोमठाणा येथील खून प्रकरणात आठ जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी मुख्य आरोपी असलेल्या छत्रपती निर्वळ याला पोलिसांनी अटक केली होती. उर्वरित सात जण फरार झाले होते. मात्र अटक केलेला एक आरोपी थेट पोलीस ठाण्यातूनच फरार झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.