पालकांनी शिर्डीच्या नावाखाली इंदूरला नेऊन लग्न लावले, अल्पवयीन मुलीने मांडली कैफियत
By राजन मगरुळकर | Published: June 24, 2023 06:19 PM2023-06-24T18:19:08+5:302023-06-24T18:19:33+5:30
इंदूर येथून पळ काढून थेट परभणी गाठली; मुलीची आई-वडिलांसह पाच जणांविरुध्द फिर्याद
परभणी : एका अल्पवयीन मुलीला तिचे आईवडील शिर्डीला दर्शनासाठी जाऊ, असे म्हणून घरातून घेऊन गेले. यानंतर शिर्डीत न जाता मनमाड येथून थेट इंदूर गाठून मुलीच्या आईवडिलांनी तिच्या मर्जीविरुद्ध मुलीचे लग्न लावले. हा धक्कादायक प्रकार १८ मे रोजी घडला आहे. लग्नानंतर सदरील अल्पवयीन मुलीने इंदूर येथून पळ काढून थेट परभणी ग्रामीण पोलिस ठाणे गाठले आणि सदरील प्रकरणात आईवडिलांसह अन्य पाच जण सहभागी असल्याचा गुन्हा २२ जून रोजी नोंदविण्यात आला.
याबाबत पोलिस सूत्रांची माहिती अशी, परभणी तालुक्यातील एका गावातील एक अल्पवयीन मुलगी मागील वर्षी आठवी इयत्तेत शिकत होती. घटनेनुसार, ४ मे रोजी रात्री अल्पवयीन मुलीला तिच्या आईवडिलांनी उद्या रेल्वेने शिर्डीला दर्शनासाठी जाऊ, असे सांगितले. त्यानुसार ५ मे रोजी मुलगी तिच्या आईवडिलांसमवेत गावातून परभणी स्थानकावर आली. स्थानकावर तिच्या आईवडिलांच्या ओळखीचा एक इसम व त्याची पत्नी त्यांना भेटले. हे सर्व जण रेल्वेने मनमाड येथे गेले. तेथून शिर्डीला न जाता खंडवा मार्गे इंदूर येथे ६ मे रोजी पहाटे पोहोचले. सोबत आलेल्या इसमाच्या नात्यातील एका मुलीच्या घरी सर्व जण गेले. तेथून परिसरातील काही ठिकाणी फिरून ते परत इंदूर येथे आले. १८ मे रोजी सायंकाळी सदरील अल्पवयीन मुलीला दोन जणांनी बाहेर फिरायला नेले व तेथून दोन हार विकत घेऊन घरी परतले.
लग्नाचे वय नाही, मी लग्न करणार नाही
यानंतर अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांनी तुझे आता लग्न करायचे आहे, असे सांगितले. त्यावर अल्पवयीन मुलीने मला आताच लग्न करायचे नाही. माझे लग्नाचे वय नाही, असे आईवडिलांना व इतर सर्वांना सांगितले. परंतु, आईवडिलांनी मुलीचे ऐकले नाही. त्याच दिवशी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलीचे घरातच एकाशी लग्न लावले. या लग्नानंतर सदरील लग्न लावलेला इसम त्याच्या घरी निघून गेला.
...अन् आईवडील गावाकडे परतले
यामध्ये २१ मे रोजी इंदूर येथील संबंधित लग्न लावलेल्या इसमाच्या घरी अल्पवयीन मुलीला सोडून मुलीचे आईवडील गावाकडे परतले. या सर्व प्रकारानंतर सुमारे एक महिना मुलीने तेथे काढला.
मुलीने काढला इंदूर येथून पळ
अखेर २१ जून रोजी सदरील अल्पवयीन मुलगी संबंधितांच्या घरातून कोणाला काही न सांगता ट्रॅव्हल्सने परभणीत परतली. तिने थेट पोलिस ठाणे गाठून या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी २२ जून रोजी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून मुलीचे आईवडील व अन्य पाच जण यांच्यावर गुन्हा नोंद झाला. परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम ९, १०, ११ अन्वये गुन्हा नोंद झाला आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे करीत आहेत.
आरोपी फरार, शोध सुरु
सदरील घटनेत परभणी ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला महिलागृहात पाठविले आहे. सद्य:स्थितीत या घटनेतील सर्व आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
- रागसुधा आर., पोलिस अधीक्षक.