कर भरूनही सुविधा नाहीत; खानापूर भागातील नागरिकांचा मनपावर आक्रोश महामोर्चा
By मारोती जुंबडे | Published: April 5, 2023 03:21 PM2023-04-05T15:21:29+5:302023-04-05T15:22:11+5:30
शहरातील खानापूर भागातून हा मोर्चा मनपापर्यंत निघाला.
परभणी : खानापूर परिसरातील सर्व वसाहतींमध्ये मूलभूत सोयी- सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या विविध मागण्यांसाठी नागरिकांनी बुधवारी महापालिकेवर आक्रोश मोर्चा काढला.
शहरातील खानापूर भागातून हा मोर्चा मनपापर्यंत निघाला. मोर्चाचे नेतृत्व किर्तीकुमार बुरांडे यांनी केले. यामध्ये खानापूर परिसरातील सर्व वसाहतीमध्ये पक्क्या नाल्या बांधून परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृह तत्काळ सुरू करावेत. छत्रपती संभाजीनगरचे रेड घेऊन तत्काळ उठवावे, खानापूर नगर येथील स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागण्या प्रशासनाकडे मांडण्यात आल्या. खानापूर परिसरातील संभाजीनगर येथील रेड झोन उठविण्यात यावे, तेथे तत्काळ मूलभूत सुविधा रस्ते, नाली देण्यात यावे, परिसरातील अनुसया नगर, खानापूर गावठाण, तिरुपतीनगर, संभाजीनगर, नरसिंहनगर, श्रीकृष्णनगर, राजूरत्ननगर, पवनसुतनगर, आरोग्यनगर, श्रीहरीनगर व विविध वसाहतीत मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. कर भरूनही या भागातील नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने गैरसोय होत आहे.
खानापूर पिंगळी मुख्य रस्त्यावरील विद्युत पोल काढण्यात यावेत, खानापूर फाटा ते पिंगळी नवीन रस्त्यावरील नाल्या उंच झाल्याने पावसाळ्यात पूर्ण परिसरात तलावाचे स्वरूप होत आहे, त्याची व्यवस्था करण्यात यावी, कचरा नेण्यासाठी पाच घंटागाड्या सुरू कराव्यात, नळाच्या पाण्याचा पुरवठा तत्काळ सुरू करावा, अशा विविध मागणी करण्यात आल्या. आंदोलनात बालाजी मोहिते, माऊली काळे, जगन्नाथ जाधव, ॲड. पंडित, हंसाजी गोडबोले, शशिकांत शिंदे, गंगाराम शिंदे, सतीश शिंदे, रघुनाथ शिंदे, राजू शिंदे, गणेश राठोड, सतीश लांडे, चक्रधर शिंदे, अमोल मोहिते, विलास मोहिते, वंजारे, लक्ष्मीकांत उदावंत, कैलास आगलावे, ओंकार गिरी, अनिल जाधव यांचा समावेश होता.