महसूल सहायकाने आधी मागितले एक लाख, तडजोडीत स्वीकारली ५० हजाराची लाच
By राजन मगरुळकर | Published: October 1, 2024 08:12 PM2024-10-01T20:12:56+5:302024-10-01T20:13:17+5:30
समृद्धी महामार्गात संपादित झालेल्या शेतजमिनीचा मोबदला देण्यासाठी लाच घेतली; महसूल सहायकासह खासगी इसम अटकेत
परभणी : तक्रारदाराच्या समृद्धी महामार्गात संपादित झालेल्या शेतजमिनीचा मोबदला खात्यावर जमा करण्यासाठी व शेतातून गेलेल्या पाइपलाइनच्या नुकसान भरपाई कामासाठी गंगाखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयातील महसूल सहायकाने एक लाखांच्या लाचेची मागणी खासगी इसमामार्फत केली होती. याप्रकरणी मंगळवारी पंचासमक्ष केलेल्या सापळा कारवाईदरम्यान आरोपी लोकसेवकाने ५० हजारांची लाच तक्रारदाराकडून स्वीकारली. ही कारवाई गंगाखेडला मंगळवारी करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अमोल बालाजी खेडकर (महसूल सहायक) आणि दादाराव मारोतीराव गडगिळे (खाजगी इसम) असे या प्रकरणातील आरोपी लोकसेवकांची नावे आहेत. तक्रारदारांचे चांगेफळ गावातील गट क्रमांक ६८ मधील शेतजमीन जालना-नांदेड समृद्धी महामार्गकरिता संपादित झाली आहे. तक्रारदार यांना जमिनीचा मोबदला मंजूर झाला असून त्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झाली नाही. संपादित जमिनीतून जाणारे पाइपलाइनचे नुकसान भरपाईकरिता नोंद केली नाही. त्यामुळे तक्रारदारांचा पाठपुरावा सुरू होता. मंजूर संपादित शेतजमिनीचा मोबदला व पाइपलाइनचे नुकसानभरपाई कामासाठी महसूल सहायक अमोल खेडकर यांनी खासगी इसम दादाराव गडगिळे यांच्यामार्फत तक्रारदारांना गंगाखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयात येण्याचा निरोप दिला. त्यावरून आरोपी लोकसेवक खेडकर यांनी प्रलंबित कामासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदार यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी लाच दिली नाही. ३० सप्टेंबरला एसीबी परभणी कार्यालयात आरोपी लोकसेवक अमोल खेडकर व खासगी इसम दादाराव गडगिळे यांच्याविरुद्ध तक्रार दिली.
आधी मागितले एक लाख, स्वीकारले ५० हजार
पंचासमक्ष ३० सप्टेंबरला केलेल्या लाच मागणी पडताळणी कारवाईमध्ये खासगी इसम दादाराव गडगिळे यांनी तक्रारदार यांचे शेतजमिनीचा मंजूर मोबदला बँक खात्यात टाकण्यासाठी आरोपी लोकसेवक अमोल खेडकर यांच्यासमक्ष एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती अमोल खेडकर यांनी कामासाठी ५० हजार लाच मागणी स्वीकारण्याची तयारी दर्शविली. मंगळवारी पंचासमक्ष केलेल्या सापळा कारवाईत आरोपी लोकसेवक अमोल खेडकर यांनी तक्रारदार यांच्याकडून ५० हजार लाच स्वीकारली. त्यास लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले. खासगी इसम दादाराव गडगिळे यांचा शोध घेऊन अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी गंगाखेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या पथकाने केली.