मानसिक रुग्ण पतीचे धक्कादायक कृत्य; झोपेतील पत्नीचा बेल्टने गळा आवळून केला खून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 05:17 PM2023-03-13T17:17:17+5:302023-03-13T18:05:54+5:30
जिंतूर शहरातील घटना; किरकोळ कारणावरुन झाले कडाक्याचे भांडण
जिंतूर : रडणाऱ्या मुलास घेण्यास नवऱ्याने नकार दिल्यामुळे पती-पत्नीमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर भांडणात झाले. भांडणाचा राग मनात धरून पतीने कमरेच्या बेल्टने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना सोमवारी जिंतूर शहरातील रमाई नगरात घडली.
शहरातील रमाई नगरात राहणारे राजू अवचार व मयत सुनिता राजू अवचार यांच्यामध्ये १३ मार्च रोजी रात्री १२ ते सकाळी ६ वाजे दरम्यान नवरा-बायकोमध्ये वाद झाला. रडणाऱ्या मुलास घ्या, म्हणून पत्नीने राजू यास सांगितले असता आरोपी व त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर नवऱ्याने कमरेला लावलेला बेल्ट काढून पत्नीचा गळा आवळला. त्यानंतर पत्नी बेशुद्ध अवस्थेत पडून होती. सकाळी हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर या संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोफणे, पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास कोकाटे, उपनिरीक्षक साहेबराव चौरे, कॉ. लीला जोगदड, बाळकृष्ण कांबळे, उमेश चव्हाण, गजानन बंदुके आदींच्या पथकाने धाव घेत घटनास्थळावरून बेशुद्ध अवस्थेत विवाहित महिलेस नातेवाईकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉ. देवीदास गरड यांनी तपासून मृत घोषित केले.
आरोपी होता मनोरुग्न
दरम्यान, राजू आवचार हा मनोरुग्न होता त्याच्यावर औरंगाबाद येथे काही दिवस उपचार करण्यात आले होते. नवरा- बायको विभक्त राहत होते. परंतु, घरी लग्न असल्याचे कारण सांगून राजू आवचार याने काही दिवसापूर्वीच पत्नीला जिंतूर येथे आणले होते, या संदर्भातली फिर्याद संतोष नितनवरे यांनी जिंतूर पोलिसात दिली. त्यावरून आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सदरील प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास कोकाटे हे करीत आहेत.