महाराष्ट्रावर लागलेला गद्दारीचा कलंक धुवून काढणारच; उमेदवारी मिळताच ठाकरेंच्या शिलेदाराने फुंकलं रणशिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 13:03 IST2024-03-27T12:59:05+5:302024-03-27T13:03:04+5:30
Sanjay Jadhav: परभणी लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेनं विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांना पुन्हा संधी दिली आहे.

महाराष्ट्रावर लागलेला गद्दारीचा कलंक धुवून काढणारच; उमेदवारी मिळताच ठाकरेंच्या शिलेदाराने फुंकलं रणशिंग
Shivsena UBT ( Marathi News ) :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज लोकसभा निवडणुकीसाठी १७ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत न जाता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहिलेल्या खासदारांवर पक्षाने पुन्हा एकदा विश्वास टाकल्याचं उमेदवार यादीतून स्पष्ट झालं. परभणी लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेनं विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांना पुन्हा संधी दिली आहे. उमेदवारीची घोषणा होताच संजय जाधव यांनी एक पोस्ट लिहीत उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहेत. तसंच एकनाथ शिंदेंच्या पक्षाला इशाराही दिला आहे.
संजय जाधव यांनी म्हटलं आहे की, "महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या कृपेने आणि हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने माझी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा परभणी लोकसभेचा उमेदवार म्हणून सलग तिसऱ्यांदा घोषणा झाली आहे. मधल्या काळात महाराष्ट्रातील राजकीय स्थित्यंतरे आपण पाहिली. शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या झंजावाताला घाबरून जाऊन तुमच्या-माझ्या शिवसेनेला कमजोर करण्याचा जो प्रयत्न झाला, तो आपण पाहिलाच आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून आपला हा मतदारसंघ ओळखला जातो. जी ताकद आणि विश्वास तुम्ही मागील तीन दशकांपासून शिवसेनेच्या पाठीशी उभा केला, त्याला सार्थ करण्याचा प्रयत्न करणार आहे. लढाई मोठ्या जिकिरीची आहे. आपण हाती धरलेला निष्ठेचा आणि स्वाभिमानाचा भगवा पुन्हा एकदा दिल्लीवर फडकवायचा आहे. त्यासाठी तुमची साथ आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असू देत," असं आवाहन जाधव यांनी केलं आहे.
दरम्यान, "महाराष्ट्रावर लागलेला गद्दारीचा कलंक परभणी लोकसभेतील सुजाण मतदार धुवून काढणारच आहेत. यापुढील काळातही जिल्ह्याच्या प्रगतीसाठी, तुमच्या न्याय हक्कांसाठी झुंजार लढा देण्याची ताकद मला आपणा सर्वांच्या रूपाने मिळेल, हा विश्वास व्यक्त करतो," असंही संजय जाधव यांनी म्हटलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली उमेदवार यादी :
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे..
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 27, 2024
*मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.
इतर 16 उमेदवार… pic.twitter.com/nPg2RHimSF