सूर्य कोपला! परभणीच्या तापमानाने गाठला उच्चांंक; यंदाचे सर्वाधिक तापमान @ ४४ अंश
By मारोती जुंबडे | Published: May 25, 2024 03:38 PM2024-05-25T15:38:08+5:302024-05-25T15:38:22+5:30
नागरिकांची घालमेल वाढली
परभणी: आग ओकणारा सूर्य आणि अंगातून घामाच्या धारा यामुळे जिल्ह्यातील नागरिक हैराण झाले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी शहराच्या कमाल तापमानाने चाळीशी पार केल्याने दिवसभर रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. उन्हाचा तीव्र चटके नागरिकांना सहन करावे लागले. त्यातच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण मौसम सेवेने शनिवारी यंदाचे सर्वाधिक ४४ अंश तापमानाची नोंद केल्याने परभणीकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
यंदाचा उन्हाळा जिल्ह्यासाठी काही दिलासादायक असण्याचा अंदाज एप्रिल व मे मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे हवामान तज्ञांनी वर्तविला होता. मात्र दोन दिवसापासून जिल्ह्यातील तापमानात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ४३ अंश तापमानाची नोंद घेण्यात आली. त्यातच यंदाचे जिल्ह्यातील सर्वाधिक कमाल तापमान शनिवारी नोंद झाले. यामध्ये शनिवारी ४४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंद झाल्याची माहिती ग्रामीण कृषी मोसम सेवा केंद्राने दिली. वाढलेल्या कमाल तापमानाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागला. शनिवारी परभणी शहरातील बाजारपेठेत सायंकाळी ५ वाजेपर्यंत शुकशुकाट दिसून येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या पुढील दोन दिवस पारा ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता वर्तविल्याने परभणीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
उष्माघात रोखण्यासाठी उभारला कक्ष
जिल्ह्यचे तापमान ४४ अंशावर पोहोचल्याने उस्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य विभागानेही सावध पावले उचलले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात १ एप्रिल पासून उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे २० स्वतंत्र बेडची ही व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
असा टाळा उष्माघात...
शेतातील कामे सकाळी ६ ते ११ व दुपारी ४ ते ६.३० या कालावधीत करा.
काम करत असताना मध्ये- मध्ये थोडा वेळ थांबून पाणी प्या.
शक्यतो सुती (काॅटन) व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा.
डोक्यावर रुमाल टोपी इत्यादीचा वापर करा.
आहारात ताक, दही इत्यादीचा वापर करा. तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ, मद्यपान व मांसाहार टाळा.
कोल्ड्रिंकऐवजी लिंबू सरबत, नारळपाणी याचा वापर करा.
दुपारी ११ ते ४ पर्यंत काम, प्रवास टाळा.
लहान मुलांना, गरोदर मातांना, आजारी व्यक्तींना दुपारच्या वेळी बाहेर पडू देऊ नका.