मनपा कर्मचारी एसीबीच्या सापळ्यात; मालमत्ता हस्तांतरणासाठी कर निरीक्षकाने घेतली लाच
By राजन मगरुळकर | Published: August 5, 2023 11:46 AM2023-08-05T11:46:19+5:302023-08-05T11:47:13+5:30
महापालिका हद्दीतील स्थावर मालमत्ता आईच्या नावावर करण्यासाठी घेतली लाच
परभणी : तक्रारदार यांच्या आईच्या नावाने महापालिका हद्दीतील स्थावर मालमत्ता आईच्या नावावर हस्तांतरण करून देण्यासाठी मनपाच्या प्रभाग समिती क अंतर्गत कार्यरत असलेल्या एका कर निरीक्षकाने साडेचार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या कर निरीक्षकाविरुद्ध परभणी एसीबीच्या पथकाने शुक्रवारी सापळा कारवाई केली. यात तक्रारदाराकडून सदरील साडेचार हजारांची लाचेची रक्कम आरोपी लोकसेवकाने स्वीकारली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री साडेदहा वाजता सुरू होती.
मनपा प्रभाग समिती क चे कर निरीक्षक पठाण शेरखान नूरखान असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या आईने परभणी महापालिका हद्दीत स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे. ही स्थावर मालमत्ता त्यांच्या आईच्या नावावर हस्तांतरणाचे काम करून देण्यासाठी आरोपी लोकसेवक याने तक्रारदाराकडे एकूण ११ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यात सहा हजार पाचशे रुपये शासकीय फीस असेल व उर्वरित रक्कम चार हजार पाचशे रुपये हे टेबलावर द्यावे लागतात, असे सांगून लाच मागणी करीत असल्याची तक्रार प्राप्त झाली.
त्यानुसार शुक्रवारी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवकाने तक्रारदाराकडे ११ हजारची मागणी केली. त्यातील सहा हजार पाचशे रुपये शासकीय फीस असेल व उर्वरित चार हजार पाचशे रुपये रक्कम ही सहीसाठी टेबलावर द्यावी लागते, असे म्हणून लाच मागणी केली. सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक शेरखान पठाण यांनी मागणी केलेली फी व लाचेची रक्कम त्यांना देण्यासाठी तक्रारदार हे पंचासह प्रभाग समिती क च्या कार्यालयात गेले तेथे त्यांनी ११ हजार रुपयांची एकूण रक्कम स्वीकारली.
पावती १० दिवसांनी मिळेल
यामध्ये तक्रारदार याने आरोपी लोकसेवकास सहा हजार पाचशे रुपयांची शासकीय पावती मागितली असता सदर पावती दहा दिवसानंतर मिळेल, असे सांगितले. आरोपी लोकसेवक यास लाचेचा रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नवा मोंढा ठाण्यात सुरू आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक ईप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद हनुमंते, रवींद्र भूमकर, सीमा चाटे, अनिरुद्ध कुलकर्णी, अतुल कदम, मो.जिब्राइल, शेख मुख्तार, राम घुले, कदम यांनी केली.