विद्यार्थ्यांना दिले वाहतूक शाखेने सुरक्षित प्रवासाचे धडे
By राजन मगरुळकर | Published: July 26, 2023 04:40 PM2023-07-26T16:40:16+5:302023-07-26T16:41:12+5:30
परभणी शहर वाहतूक शाखेच्या वतीने हा उपक्रम बुधवारपासून राबविण्यात सुरुवात झाली.
परभणी : शालेय विद्यार्थ्यांची विविध वाहनाद्वारे वाहतूक करताना सुरक्षितता असावी, यासाठी शहर वाहतूक शाखा पथकाने बुधवारी पाच शाळांना भेटी दिल्या. या शाळेमध्ये प्रार्थना, परिपाठाच्या वेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक, वाहन चालकांना विद्यार्थ्यांची प्रवासी वाहतूक सुरक्षित व्हावी, यासाठी उपाययोजना राबविण्याबाबत संवाद साधून सूचना देण्यात आल्या. या भेटीतून विद्यार्थ्यांनाही सुरक्षित प्रवासाचे धडे देण्यात आले. पोलीस दादा शाळेत तपासाला किंवा कारवाईला नव्हे तर आपल्याला धडे देण्यासाठी आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले.
परभणी शहर वाहतूक शाखेच्या वतीने हा उपक्रम बुधवारपासून राबविण्यात सुरुवात झाली. बुधवारी सकाळच्या सत्रामध्ये जिंतूर रोड भागातील प्रेसिडेन्सी इंग्लिश स्कूल, बाल विद्यामंदिर, सेंट ऑगस्टिन या शाळांना भेट देण्यात आली तर दुपारच्या सत्रामध्ये जिंतूर रोड भागातील अन्य दोन शाळांना भेट देऊन वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक वामन बेले यांच्या मार्गदर्शनाखाली दहा ते पंधरा पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी शाळेत जाऊन संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य, पालक, विद्यार्थी आणि विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांशी संवाद साधला.
मैदानामध्ये एकत्रितरित्या जमलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत येताना आणि जाताना वाहनांमध्ये काही अडचणी आहेत का, दाटीवाटीने बसावे लागते का, इतर सुविधा दिल्या जातात का, वाहतूक नियमाचे पालन करावे, याविषयी वाहन चालकांना सुचित करण्यात आले. त्यामुळे एक प्रकारे नेहमी कारवाईसाठी रस्त्यावर उभे राहणारे पोलीस थेट शाळेमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून जनजागृती करण्यास आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
यांचा मोहिमेत सहभाग
या मोहिमेत पोलिस उपनिरीक्षक मकसूद पठाण, रवींद्र दीपक, रामेश्वर सपकाळ, अनिल राठोड, तेजश्री गायकवाड, सुनिता राठोड, अनिल गायकवाड, वाहन चालक बचाटे यांचा समावेश होता.
दररोज दिली जाणार शाळांना भेट
वाहतूक व्यवस्था तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता पुढील दोन ते तीन दिवस शहरात प्रमुख मार्गावर, वर्दळीच्या भागात असलेल्या मुख्य शाळांना भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांची ने-आण करताना ऑटो स्कूल, व्हॅनमार्फत काय काळजी घेतली जावी, विद्यार्थ्यांनी याबाबत अडचण असल्यास थेट प्राचार्य, पालक तसेच शिक्षक यांच्याशी संवाद साधावा. याविषयी माहिती देण्यात आली.
सुरक्षित प्रवासासाठी सूचना
विद्यार्थ्यांच्या मनातील पोलिसांविषयीची भीती दूर व्हावी तसेच त्यांना शालेय जीवनापासून विविध वाहतूक नियमांचे पालन करण्याची शिस्त लागावी. यासाठी या भेटी देऊन जनजागृतीचा उपक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून कारवाईपेक्षा सुरक्षित प्रवास व्हावा, या दृष्टीने सर्वांना सूचना दिल्या जात आहेत.
- वामन बेले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा.