'गद्दारांना पाय ठेऊ देणार नाही'; शिवसेनेतील बंडखोरांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे परभणीत दहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 06:44 PM2022-06-25T18:44:22+5:302022-06-25T18:45:10+5:30
राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवरुन परभणीतील शिवसैनिकांमधून संतापाची लाट निर्माण झाली आहे.
परभणी: शिवसेनेशी जो नडला, त्याला शिवसैनिकांनी गाडला, गद्दारांचं करायचं काय... अशी जोरदार घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी शनिवारी परभणीत पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जिल्ह्यात कदापि पाऊल ठेऊ देणार नाही, असा दृढनिश्चिय करीत राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवरुन परभणीतील शिवसैनिकांमधून संतापाची लाट निर्माण झाली आहे. या अनुषंगाने निषेध करण्यासाठी शनिवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमा झाले. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे छायाचित्र दोन गाढवांना लावून त्यांची धिंड काढण्यात आली. तसेच या दोन्ही नेत्यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून जोरदार घोषणाबाजी केली. ‘गद्दारांचं करायचं काय...’ ‘शिवसेनेशी जो नडला...’ अशी घोषणाबाजी करीत एकच साहेब... उद्धव साहेब, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, शिवसेना जिंदाबाद आदी घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. यावेळी बोलताना माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव म्हणाले की, परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिक उद्धव साहेबांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. शिवसेना हा आमचा श्वास असून पक्षाशी जो गद्दारी करेल, त्याला शिवसैनिक कधीही माफ करणार नाहीत, असेही ते म्हणाले. खासदार बंडू जाधव व आमदार डाॅ.राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात
युवासेनेचे जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, प्रा. पंढरीनाथ धोंडगे, अतुल सरोदे, दीपक बारहाते, सदाशिव देशमुख, माणिकराव आव्हाड, माणिक पोंढे, पंढरीनाथ घुले, काशिनाथ काळबांडे, जितेश गोरे, मुंजा कदम, प्रदीप भालेराव, सुनील पंढरकर, संदीप झाडे, बाळराजे तळेकर, विशू डहाळे, रामप्रसाद रणेर, भगवान धस, दगडू काळदाते, रावसाहेब रेंगे, संजय सारणीकर, सुभाष जोंधळे, पप्पू वाघ, गोविंद जाधव, प्रल्हाद लाड, जनार्दन सोनवणे, परमेश्वर सुक्रे, दामोदर घुले, सुभाष देशमुख, अरविंद देशमुख, रवी पतंगे, ओंकार शहाणे, दिनेश बोबडे, चंदु शिंदे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
मंत्रीपद देऊनही घात केला - विवेक नावंदर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नंतर शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे खाते दिले. राज्यभरातील शहरांसाठी निधी वितरणाकरीता तिजोरीच्या चाव्या दिल्या. तरीही एकनाथ शिंदे यांनी पक्षाशी गद्दारी केली. गुलाबराव पाटलांसह इतरांनीही हाच कित्ता गिरवला. त्यांनी पक्षनिष्ठेशी गद्दारी करुन घात केला आहे. त्यामुळे अशा गद्दारांना आगामी काळात शिवसैनिक घरचा रस्ता दाखवतील. परभणी जिल्ह्यात या गद्दारांना शिवसैनिक पाय ठेवू देणार नाहीत. ज्यांनी तुम्हाला आतापर्यंत मान-सन्मान, मंत्रीपदे दिली, त्यांच्याशीच तुम्ही बेईमानी केली. तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. शिवसैनिक आता मात्र शांत बसणार नाही,असे शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर यांनी सांगितले.