समोरील ट्रकने हूल दिली अन् एसटी रस्त्याखाली उतरली; ६० प्रवासी बालंबाल बचावले
By ज्ञानेश्वर भाले | Published: April 6, 2023 03:03 PM2023-04-06T15:03:08+5:302023-04-06T15:03:22+5:30
परभणी-गंगाखेड महामार्गावरील धारासूर पाटीजवळील घटना
दैठणा (जि. परभणी) : समोरून येणाऱ्या ट्रकने हूल दिल्याने बस अनियंत्रित होऊन अपघात घडला. या घटनेत बसमधील प्रवासी बालंबाल बचावले असून, अपघातात बसचे मोठे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी परभणी-गंगाखेड महामार्गावरील धारासूर पाटीजवळ घडली.
दिवसेंदिवस एसटी अपघातांच्या संख्येत भर पडत आहे. गुरुवारी परभणी आगारातून बस (एमएच- २०, बीएल- २६९३) सकाळी कोल्हापूरकडे जाण्यासाठी निघाली. परभणी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरून धारासूर पाटीमार्गे कोल्हापूरकडे जात होती. दरम्यान, धारासूर पाटीजवळ येताच समोरून येणाऱ्या एका आयशर ट्रकने हूल दिली. यामुळे एसटीचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पुलाच्या कठड्याला धडकली. अपघातासमयी बसमध्ये ६० प्रवासी होते. यामुळे बसमध्ये एकच गोंधळ उडाला. बस पुलावर लटकलेल्या स्थितीत असताना प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले. येथील मार्गावर दिवसेंदिवस अपघाताच्या घटना घडत असून, या ठिकाणी गतिरोधक उभारण्याची मागणी होत आहे.