ग्रामस्थांची एकजूट आली कामी; गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मिळाले १४ कोटी
By मारोती जुंबडे | Published: April 24, 2023 07:08 PM2023-04-24T19:08:56+5:302023-04-24T19:09:16+5:30
धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिर; २८ कोटी ५८ लाख मिळणार दोन टप्प्यांत
परभणी : गोदावरी नदीच्या काठावर असलेले गुप्तेश्वर मंदिर चालुक्यकालीन आहे. सद्य:स्थितीत या मंदिराची मोठी पडझड झाली आहे. त्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १७ सप्टेंबर रोजी निधी देण्याचे घोषित केले. त्यानुसार या मंदिराच्या उभारणीसाठी २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीचे दोन टप्पे करण्यात आले. यामध्ये १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून १४ कोटी ७९ लाख ९५ हजार ४८५ रुपयांच्या रकमेला मंजुरी देण्यात आली.
गंगाखेड तालुक्यातील धारासुर येथील गोदावरी नदीच्या काठावर असलेले गुप्तेश्वर मंदिर चालुक्यकालीन असून, त्याची रेखीव स्थापत्य रचना लक्षवेधी आहे. या मंदिराची मोठी पडझड सध्या सुरू आहे. त्यानुसार मंदिर जतन व दुरुस्तीसाठी आवश्यक तो निधी पुरातन विभागाकडून उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी धारासुर ग्रामस्थांनी राज्य शासनाकडे केली. त्यानंतर राज्य शासनाने या ग्रामस्थांची दखल घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमात २८ कोटी ५८ लाख १५ हजार रुपयांच्या रकमेचे अंदाजपत्रक तयार केले. त्यानंतर हा निधी टप्प्याटप्प्याने मिळेल व या मंदिराचे जतन होईल, असे जाहीर केले होते. नागपूर येथील अधिवेशनात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही दोन महिन्यांच्या आत पुरातन विभागाकडे संबंधित निधी वर्ग केला जाईल, असे आमदार रत्नाकरराव गुट्टे यांनी मांडलेल्या लक्षवेधी तारांकित प्रश्नाला उत्तर दिले होते. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही अद्यापपर्यंत हा निधी पुरातन विभागाकडे उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांची इच्छा हे मंदिर जतन व संवर्धन करण्यासाठीचे आहे. यात शासनाला काय अडचण असेल, असा प्रश्न आता ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात होता. त्यानंतर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने १९ एप्रिल रोजी गंगाखेड तालुक्यातील धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिराच्या राज्य सुरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्ती कामाच्या अंदाजपत्रकात प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात १४ कोटी ७९ लाख ९५ हजार ४८५ रुपयांच्या रकमेला आता प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कामास आता गती येणार आहे.
रेखीवपणा नजरेत भरणारा
सध्या मंदिराचा उत्तरेकडील भाग कोसळलेल्या स्थितीत आहे. मंदिरावर अप्सरा, गणेश, सुरसुंदरी यांच्या नक्षीदार मूर्ती आहेत. मूर्तींची वेशभूषा, केशरचना, भाव मुद्रा आणि रेखीवपणा नजरेत भरणारा आहे. प्राचीन स्थापत्य शैलीसाठी प्रसिद्ध असलेली मोजकी मंदिरे आहेत. गुप्तेश्वर मंदिराच्या अभ्यासासाठी देशभरातील अभ्यासकांनी भेट देऊन माहिती घेतली आहे.
कामाचे स्वरूप
पहिला टप्पा
मंदिराचे क्षेत्रफळ
संरक्षण भिंत तयार करणे
मंदिराचा सभामंडप, अर्धमंडप
अंतराळ गर्भ ग्रह व पूर्ण मंदिर उतरणे.
दुसरा टप्पा
मंदिराचा पाया खोदणे व पाया मजबूत करणे.
मंदिराच्या प्रतीक्षालय मार्गापर्यंत काम पूर्ण करणे.
सभा मंडप, अर्ध मंडप, अंतराळ काम करणे.
तिसरा टप्पा
मंदिराचे शिखर उभारणे
पुरातन विभाग महाराष्ट्र राज्य शासन
व राज्यसंरक्षित स्मारक नोटीस बोर्ड स्थापन करणे.