रिल्सच्या नादात तरुणांचे भान हरपले; भरधाव दुचाकींची जैन मुनींना धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 12:35 PM2023-02-27T12:35:47+5:302023-02-27T12:38:27+5:30
बोरी-जिंतूर रस्त्यावर झाला अपघात; मुनीश्री सौम्यसागरजी महाराजांसह एक भाविक जखमी
जिंतूर ( परभणी): रिल्स बनविण्याच्या नादात भरधाव वेगातील दुचाकी चालकांनी जैन मुनींना जोरदार धडक दिल्याची घटना बोरीजवळील करपरा नदीच्या पुलावर रविवारी ( दि. २६) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. यात मुनीश्री सौम्य सागरजी महाराज व जिंतूर येथील सेवेकरी तरुण संकेत मोहारे जखमी झाले आहेत.
जैन मुनीश्री सौम्यसागरजी महाराज हे रविवारी सायंकाळी अन्य ५ मुनींश्रीसोबत चालत बोरीवरून चांदजकडे जात होते. दरम्यान, करपरा नदीच्या पुलावर दोन भरधाव दुचाकींवरील चार युवक रील्स बनवत होते. याचवेळी येथून संघासह मुनीश्री सौम्यसागरजी महाराज जात होते. अनियंत्रित दुचाकींनी मुनीश्री सौम्यसागरजी महाराज आणि एका सेवेकऱ्यास जोरदार धडक दिली. यात दोघेही जखमी झाले. रक्तबंबाळ अवस्थेत ही होणाऱ्या वेदना सहन करत मुनींश्री घटनास्थळी बसले होते. घटनेची माहिती मिळताच डॉ. विशाल परिहार, सचिन राठोर यांच्यासह जैन साधकांनी घटनास्थळी धाव घेतली. मुनींश्री सौम्यसागरजी महाराज यांच्या पायाला व डोक्याला मार लागला आहे.
वाहनात बसण्यास नकार दिला
अपघातानंतर मुनींश्रीना उपचारासाठी वाहनातून रुग्णालयात चालण्याची विनंती करण्यात आली. मात्र त्यांनी नम्रपणे नकार दिला. याबाबत त्यांच्या गुरूंना माहिती देण्यात आली. त्यानंतर गुरू आदेशाने ते स्ट्रेचरवर बसले. भाविकांनी स्ट्रेचर ढकलत जिंतूरपर्यंत आणले.