दुकानातील चोरीच्या घटनेचा पाच तासात उलगडा, साडेतीन लाखाच्या मुद्देमालासह आरोपी ताब्यात
By राजन मगरुळकर | Published: July 9, 2023 03:28 PM2023-07-09T15:28:52+5:302023-07-09T15:30:52+5:30
चोरीच्या घटनेतील आरोपीचा शोध स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अवघ्या पाच तासात लावला.
राजन मंगरुळकर, परभणी: शहरातील जिंतूर रोड भागातील सुपर शॉपीमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेतील आरोपीचा शोध स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अवघ्या पाच तासात लावला. गुन्हा उघड करून संबंधित आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून तीन लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिंतूर रोड भागातील महालक्ष्मी ग्राहक पेठ या दुकानात शनिवारी पहाटे चोरी झाल्याची तक्रार नानलपेठ ठाण्यात देण्यात आली. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. सदर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांनी स्थानिक गुन्हा शाखा व सायबर विभागाला सूचना देत गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांनी दोन पथके तयार करून शहरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपी निष्पन्न केले.
अवघ्या पाच तासाच्या आत सदर आरोपीची माहिती काढून आरोपी सुभाष अंबादास धुमाळ (रा.धनुभाई प्लॉट, परभणी) यास ताब्यात घेतले. त्याने इतर दोन आरोपींसोबत सदर गुन्हा केल्याचे कबूल केले. गुन्ह्यातील चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, साईनाथ पूयड, व्यंकट कुसुमे, बी.टी.तूपसमुंदरे, विलास सातपुते, रवी जाधव, परसोडे, रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, जयश्री आव्हाड, हरिचंद्र खूपसे, दिलावर खान, सिद्धेश्वर चाटे, मधुकर ढवळे, राम पौळ, नामदेव दुबे, गायकवाड, निलेश परसोडे, हनुमान ढगे, निकाळजे, गणेश कौटकर, संतोष मोहोळे यांच्या पथकाने केली.
चोरीसाठी वापरलेले वाहन, शस्त्र ताब्यात
सदर गुन्ह्यात चोरीचा माल नेण्यासाठी आरोपींनी वापरलेले वाहन, चोरीस गेलेल्या सुकामेवा व घरफोडीसाठी आवश्यक असलेले लोखंडी टाँमी, लोखंडी पाईप, पकड, गजाळीची गळ, वायर, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी धारधार पाते असलेले खंजीर असा एकूण तीन लाख ५७ हजार ३४८ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. आरोपी व मुद्देमाल यांना नानलपेठ ठाण्यात हजर करण्यात आले.