डोंगरांवर एकात्मिक वृक्ष लागवड करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 06:00 PM2019-05-10T18:00:22+5:302019-05-10T18:03:18+5:30

कमी पाण्यात, कमी जागेत आणि लवकर वाढणारी पारंपारिक झाडे लावण्यावर नागरिकांनी भर दिला पाहिजे़

There is a need to plant integrated tree on hills | डोंगरांवर एकात्मिक वृक्ष लागवड करण्याची गरज

डोंगरांवर एकात्मिक वृक्ष लागवड करण्याची गरज

Next

- प्रसाद आर्वीकर

पावसाळा आला की वृक्ष लागवड  मोहिमा सुरू होतात़ मात्र ही झाडे टिकत नाहीत आणि पूर्वीसारखीच परिस्थिती पुन्हा निर्माण होते़ तेव्हा वृक्ष लागवड करताना काय काळजी, कोणती झाडे कोणत्या ठिकाणी लावावीत आणि पर्यावरण संवर्धनासाठी नेमक्या कशा पद्धतीने वृक्षारोपण करावे, याविषयी येथील तज्ज्ञ प्रा. डॉ. सुनील मोडक यांच्याशी साधलेला संवाद... 

वृक्षारोपण करण्यासाठी कोणत्या जागा निवडाव्यात?
वृक्षारोपण करण्यासाठी शक्य तो शासकीय मोकळ्या जागा, माळरान आणि डोंगरी भाग निवडला पाहिजे़ आपल्या भागात येणारी खैर, बाभूळ, पळस, बिबा, विलायती चिंच, कोंदन, वड, पिंपळ, फणस ही झाडे लावण्यास प्राधान्य द्यावे़ शहराबाहेर रस्त्याच्याकडेला मोठी उंच वाढणारी झाडे लावावीत़ 

कशा पद्धतीने वृक्षारोपण करावे?  
वृक्षारोपण करताना जागा योग्य पद्धतीने निवडणे गरजचे आहे़ पारंपारिक झाडे फांदी पद्धतीने, कलम पद्धतीने किंवा साध्या पद्धतीने लावली तरी चालतात़ छोटे, मध्यम आणि उंच वाढणारी झाडे लावावीत़ झाड निवडताना ते आपल्या भागात वाढणारे असावे़ डोंगरावर मोठी झाडे जगत नाहीत़ तेव्हा छोटी झुडपे लावली पाहिजेत़ ही झुडपे माती धरून ठेवतात आणि झुडपे वाढल्यानंतर मोठी झाडे या भागात लावल्यास वनराई वाढण्यास मदत होऊ शकते.  नदी-नाल्यांच्या परिसरात वेडी बाभळ, इंगन बेट, हिवरी ही झाडे लावावीत.

संवर्धनाची जबाबदारी देणे गरजेचे
शहरी भागात महापालिकेच्या मालकीच्या मोकळया जागा झाडे लावण्यासाठी निवडाव्यात़ त्या ठिकाणी सर्व प्रकारची झाडे लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी एखाद्या संस्थेवर दिल्यास झाडे जगू शकतात़ त्यांचे योग्य पद्धतीने संवर्धनही होऊ शकेल़ वृक्ष लागवड मोहिमेवर मोठा खर्च होतो़ मात्र ही झाडे टिकत नाहीत़ तेव्हा एक झाड लावण्यासाठी येणारा खर्च आणि त्याच्या संगोपनाचे मानधन थेट नागरिकांना दिले तर वृक्षसंवर्धन होऊ शकते़

Web Title: There is a need to plant integrated tree on hills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.