परभणीत शासकीय वैद्यकीय आणि युनानी महाविद्यालयही होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 05:59 PM2020-09-12T17:59:42+5:302020-09-12T18:04:06+5:30
परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास स्थापन करण्यासंदर्भातील अनुकूल अहवाल मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन शिक्षण संचालकांनी नियुक्त केलेल्या समितीने राज्य शासनाला सादर केला आहे.
परभणी : येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबरोबरच युनानी महाविद्यालयही स्थापन होणार असून याअंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयासाठी २० एकर तर युनानी महाविद्यालयासाठी ५ एकर अशी २५ जागा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने देण्यास तत्वत: मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली.
परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास स्थापन करण्यासंदर्भातील अनुकूल अहवाल मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन शिक्षण संचालकांनी नियुक्त केलेल्या समितीने राज्य शासनाला सादर केला आहे. राज्य शासनाने या अहवालाच्या अनुषंगाने सद्यस्थितीत कारवाई केली नसली तरी महाविद्यालयासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न आ.डॉ.राहुल पाटील यांच्या पुढाकारातून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात शुक्रवारी विद्यापीठ कार्यकारी परिषदेची आॅनलाईन बैठक झाली. या बैठकीस कुलगुरु डॉ.अशोक ढवण,परिषदेचे कार्यकारी सदस्य आ.डॉ.राहुल पाटील, कुलसचिव रणजीत पाटील आदींची उपस्थिती होती.
या बैठकीत परभणी येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी २५ एकर तर युनानी शासकीय महाविद्यालयासाठी ५ आणि तालुका क्रीडा संकुलासाठी १० एकर जागा देण्यास तत्वत: मंजुरी देण्यात आली. या अनुषंगाने एका समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी आ.डॉ.राहुल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची निवड आ.पाटील यांची समिती करणार आहे. परिणामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासोबतच युनानी महाविद्यालय निर्मितीच्या मार्गातील हे महत्वपूर्ण पाऊल समजले जात आहे.