थर्माकोलची होडीच त्यांच्या शिक्षणासाठी आधार; पाथरी तालुक्यात गोदावरी पात्रातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 02:01 PM2018-08-27T14:01:39+5:302018-08-27T19:29:56+5:30
१०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रोज गोदावरी नदीचे पात्र थर्माकोलच्या होडीने पार करावे लागते.
- विठ्ठल भिसे
पाथरी (परभणी) : तालुक्यातील मंजरथ गावातील १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रोज गोदावरी नदीचे पात्र थर्माकोलच्या होडीने पार करावे लागते. शिक्षणासाठी कराव्या लागत असलेल्या या जीवघेण्या प्रवासाबाबत शासन व्यवस्था मात्र अद्याप अनभिज्ञ असल्याचेच चित्र आहे.
पाथरी तालुक्यातील मंजरथ गावची लोकसंख्या जवळपास १५०० आहे. हे गाव पाथरी शहरापासून २७ किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या काठावर आणि जिल्ह्य़ाच्या सीमेवरील आहे. गोदावरीच्या पलीकडे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील मोठे मंजरथ हे गाव आहे. या गावात येथील ग्रामस्थांचा सतत संपर्क आहे. तसेच गावातून पाथरी तालुक्यात जाण्यासाठी रस्ता नसल्याने बस येत नाही. गावात १ ली ते ५ वी शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना तालुक्याच्या गावी जाण्यासाठी रस्ता नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी पात्राकडील मोठे मंजरथ येथे प्रवेश घेतले आहेत. जवळपास १०० च्यावर विद्यार्थ्यांचे पात्रापलीकडे प्रवेश आहेत.
गोदावरी पात्रात पाणी नसल्यास विद्यार्थी आणि ग्रामस्थ हा प्रवास पायी करतात. मात्र पात्रात पाणी असल्यास हा मार्ग बंद होतो. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रोज मोठे मंजरथ येथे जावेच लागत असल्याने त्यांना थर्माकोलच्या होडीच्या सहाय्याने पात्र पार करण्याशिवाय पर्याय राहत नाही. सध्या गोदावरीचे पात्र ढालेगाव येथील बंधाऱ्याच्या बॅक वॉटर ने तुडुंब भरले आहे. पात्रात आठ महिने पाणी राहते. त्यामुळे येथील विद्यार्थी थर्माकोलच्या सहाय्याने बनवलेल्या होडीवर आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. एका वेळी एका होडीवरून केवळ १० विद्यार्थी प्रवास करू शकतात. शाळेच्या वेळेनुसार सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत या होड्या विद्यार्थ्यांची ने आन करत असतात. हा प्रकार नित्याचा बनला गेला आहे. मात्र याबाबत शासकीय यंत्रणा अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे.
रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा
अनेकवेळा ठराव घेऊन निवेदने दिली मात्र उपयोग होत नाही. नाईलाजाने विद्यार्थ्यांना असा जीवघेणा प्रवास करावा लागतो. रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून गावात बस सेवा सुरू झाल्यास हा प्रश्न' सुटेल.
- अंगद काळे, सरपंच ,मंजरथ