हे रेल्वेचे आरक्षित डबे आहेत की कोंबून भरलेली काली-पिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:22 AM2021-09-17T04:22:50+5:302021-09-17T04:22:50+5:30
परभणी : दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने अद्यापही प्रवासी संख्या जास्त असलेल्या रेल्वेंना जनरल डबे लावण्यात आलेले नाहीत. यामुळे ...
परभणी : दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने अद्यापही प्रवासी संख्या जास्त असलेल्या रेल्वेंना जनरल डबे लावण्यात आलेले नाहीत. यामुळे आरक्षित डब्यातून प्रवासी तिकीट न काढता किंवा थेट तिकीट तपासणीस आल्यावर पैसे देऊन अनेक जण प्रवास करत आहेत. यामुळे आरक्षण केलेल्या प्रवाशांची मात्र गैरसोय होत आहे.
परभणी येथून सध्या २२ ते २४ विशेष एक्स्प्रेस रेल्वे सुरू आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यासह दक्षिण व उत्तर भारतात जाणाऱ्या सर्व रेल्वेंना कोरोनामुळे विशेष रेल्वेचा दर्जा दिल्याने जनरल डबे अद्यापही लावण्यात आलेले नाहीत. या विभागातील १० ते १२ रेल्वेंना १ किंवा २ जनरल डबे जोडले आहेत. मात्र, त्या रेल्वेपेक्षा या भागातील प्रवासी संख्या जास्त असलेल्या मराठवाडा, पनवेल, तपोवन, देवगिरी, सचखंड, नंदिग्राम या रेल्वेंना हे जनरल डबे जोडणे आवश्यक आहे.
सचखंडमध्ये विक्रेत्यांची गर्दी जास्त
नांदेड- अमृतसर व अमृतसर- नांदेड या दोन्ही रेल्वेच्या आरक्षित डब्यांत सर्वाधिक त्रास फेरीवाल्यांचा सहन करावा लागतो. पेंट्री कारचा स्वतंत्र डबा असताना काही स्थानकांवर विविध खाद्यपदार्थ घेऊन विक्रेते या रेल्वेतील सर्व डब्यांतून फिरतात, तसेच टीसी प्रवाशाने तिकीट नसताना अचानक प्रवेश केला, तर त्यास आरक्षण डब्यात प्रवेश देतात, तसेच बसण्यास जागाही उपलब्ध करून देतात. यामुळे आधीपासून आरक्षण केलेल्या प्रवाशांना मात्र त्रासाला सामोरे जावे लागते.
मराठवाडा, तपोवनमध्ये पाय ठेवायलाही जागा नाही
सध्या आरक्षण न करता तसेच अप-डाऊन करणारे प्रवासी आरक्षित डब्यात थेट प्रवेश करीत आहेत. या रेल्वेमध्ये रेल्वे पोलीस, तसेच टीसी लक्ष देत नाहीत. अनेकदा विक्रेत्यांसोबत प्रवाशांचा वाद होऊन मारामारी झाल्याचे प्रकारही घडले आहेत, तसेच पैसे मागणारे, भिकारी यांचाही वावर मोठ्या प्रमाणात सर्वच रेल्वेंमध्ये झाला आहे.
सर्व गाड्यांत स्थिती सारखीच
देवगिरी, नंदिग्राम, पनवेल, पुणे, हैदराबाद, सचखंड, ओखा, अजंठा, नरसापूर यासह सर्वच गाड्यांत हीच स्थिती आहे. यामुळे प्रवासी आरक्षण करून जास्तीचे पैसे मोजत आहेत. तरी त्यांना या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.