पाथरीत चोरट्यांनी नातीच्या लग्नासाठीची रोख आणि सोने केले लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 07:26 PM2018-11-23T19:26:55+5:302018-11-23T19:27:09+5:30
बाभळगाव येथे नातीच्या लग्नासाठी घरात ठेवलेली रोकड आणि सोने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज पहाटे घडली.
पाथरी (परभणी ) : तालुक्यातील बाभळगाव येथे नातीच्या लग्नासाठी घरात ठेवलेली रोकड आणि सोने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज पहाटे घडली.
तालुक्यातील बाभळगाव येथील जगनाथ नामदेव गिराम यांच्या नातीचे काही दिवसात लग्न आहे. यासाठी त्यांनी घरात काही रोख रक्कम आणि सोने ठेवले होते. गुरुवारी रात्री त्यांची पत्नी, मुलगी आणि नात घरातील एका खोलीत झोपल्या होत्या. पहाटे मुख्य गेटचे कुलूप तोडून चोर घरात घुसले. दुसऱ्या खोलीतील कपाटात ठेवलेली दीड लाखाची रोकड व ३ तोळे सोने त्यांनी लंपास केले.
आज सकाळी झोपेतून उठल्यावर गिराम यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. पाथरी पोलिसांकडे याबाबत माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तालुक्यात ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.