दुष्काळात तेरावा; महाविद्यालयातच अडकले मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:13 AM2021-06-29T04:13:37+5:302021-06-29T04:13:37+5:30
कोरोनाच्या संसर्गामुळे मागील तीन-चार महिन्यांपासून महाविद्यालये बंद आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत ...
कोरोनाच्या संसर्गामुळे मागील तीन-चार महिन्यांपासून महाविद्यालये बंद आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाइन पद्धतीने महाविद्यालयांनी या विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र महाविद्यालये बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या अर्जांची त्रुटीची पूर्तता झाली नाही. परिणामी हे अर्ज महाविद्यालयात पडून असून, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली आहे.
६९ लाखांची शिष्यवृत्ती खात्यावर जमा
येथील समाज कल्याण विभागाकडे दाखल झालेल्या प्रस्तावांमध्ये पुणे येथून सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांच्या अर्जांची त्रुटीची पूर्तता झाली नसल्याने त्यांची शिष्यवृत्ती जमा होऊ शकली नाही.
शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील ३ हजार ६२ विद्यार्थ्यांच्या खात्यावर ४२ लाख ८९ हजार ७३८ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे व्हीजेएनटी, ओबीसी या प्रवर्गातील २ हजार ९९४ विद्यार्थ्यांच्या खात्यावर २६ लाख ४० हजार ६१० रुपयांची शिष्यवृत्ती खात्यावर जमा झाली असल्याचे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
त्रुटीची पूर्तता न झाल्याने अर्ज प्रलंबित
कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक विद्यार्थी गावाकडे गेले होते. त्यांनी दाखल केलेल्या अर्जांमध्ये त्रुटी होत्या. या त्रुटींची पूर्तता वेळेत झाली नाही. परिणामी हे हर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित राहिले आहेत. या अर्जांची त्रुटीची पूर्तता झाल्यानंतर ते समाज कल्याण विभागाकडे दाखल होती. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.